#गावगाड्याचे_इलेक्शन : सासू-सून आणि जावई-सासऱ्याच्या संघर्षात कुणी मारली बाजी?
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत सासू विरुद्ध सून आणि जावई विरुद्ध सासरा असा संघर्ष रंगला होता.;
औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत काही मजेशीर लढती पाहायला मिळाला होत्या. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात चक्क सासू विरोधात सुनेने तर जावया विरोधात सासऱ्याने निवडणुकीत उडी घेतली होती. धोंधलगावात गावात शिवशाही विरोधात छत्रपती ग्रामविकास पॅनलमध्ये थेट लढत झाली होती. ज्यात शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे या रिंगणात उतरल्या होत्या. तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे यांनी त्यांना आव्हान दिले होते. तर दुसरीकडे शिवशाही पॅनलकडून लक्ष्मण काळे निवडणुकीच्या रिंगणात तर त्यांच्याविरोधात छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून त्यांचेच सासरे रावसाहेब वैद्य एकमेकांच्या उतरले होते. त्यामुळे सासूच्या विरोधात सुनेने आणि सासऱ्याच्या विरोधात जावयाने निवडून येण्याचं दावा केला होता.
काहीवेळापूर्वी आलेल्या निकालानुसार या लढाईत सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे. मात्र जय-पराजय विसरून आता पुन्हा नेहमीप्रमाणे आपलं नात कायम राहणार असल्याचं चारही उमेदवारांनी बोलवून दाखवलं आहे.