मनुस्मृतीचे पाठीराखे कोण आहेत?

विषमवादी व्यवस्थेला सुंरुंग लावण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे 'मनुस्मृती' जाळली. ऐतिहासिक परीवर्तनवादी लढ्याच्या स्मृती टिकवण्यासाठी दरवर्षा २५ डिसेंबरला कार्यक्रम आयोजीत केला जातात. परंतू पत्रकार मीना कोटवाल यांनी ट्विटरवरुन प्रतिकात्मक मनुस्मृती दहन केल्यानंतर त्यांना धमक्यांचे सत्र सुरु झाले आहे.;

Update: 2021-12-28 05:09 GMT


मनुस्मृती जाळल्यानंतर मला आणि कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचा आरोप दलित कार्यकर्त्या आणि पत्रकार मीना कोटवाल यांनी केला आहे. त्या मूकनायक नावाचे यूट्यूब चॅनल व वेब पोर्टल चालवतात. मला काही झाल्यास यासाठी बजरंग दल आणि त्यासारख्या संघटना जबाबदार असतील अस मीना यांनी म्हंटले आहे.


 



मीना कोटवाल यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एकामागून एक ट्विट करून त्यांना मिळणाऱ्या धमक्यांची माहिती शेअर केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे की, 'मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला बजरंग दल आणि यारारख्या संघटना जबाबदार असतील. स्वतःला बजरंग दलाचा म्हणवणारा अमन काकोडिया मला फोन करून मनुस्मृती जाळणारा व्हिडीओ हटवायला सांगत असून तस केलं नाहीतर बरे होणार नाही अशी धमकी देतोय. त्या दोघांमधील कॉल रेकॉर्डिंग सुद्धा त्यांनी शेअर केले आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये मीना कोटवाल यांनी लिहिले की, मनुस्मृती जाळण्याचा व्हिडिओ हटवण्यासाठी ती व्यक्ती सतत दबाव टाकत आहे. जेव्हा मी हटवण्यास नकार दिला आणि मनुस्मृतीत महिला आणि दलितांचे वर्णन प्राण्यांपेक्षाही वाईट असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही व्यक्ती संतापली.

त्यानंतर त्यांनी आणखीन एक ट्विट केलं व त्यांनी दावा केला आहे की, बजरंग दल सारख्या संघटनेने त्यांचा फोन नंबर व्हायरल केला आहे आणि अनेक लोकांकडून फोन करून त्यांना धमकावले जात आहे आणि शिवीगाळ केली जात आहे.

अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मीना कोतवाल यांच्या बाजूने अनोळखी नंबरवरून आलेल्या धमक्यांवर आवाज उठवला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार अलिशान जाफरी यांनी ट्विट करून मीना कोतवाल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हंटले आहे.

अनेकांनी आता मीना कोटवाल यांना येत असलेल्या धमक्यांचा निषेध व्यक्त केला आहे. भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी या कृत्याचा निषेध करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, ' निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या युवा पत्रकार मीना कोटवाल यांना बजरंग दलाच्या गुंडांकडून धमक्या दिल्या जात आहेत. हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. मीनाताई या देशद्रोही गुंडांच्या धमक्यांना विचलीत होऊ नका. पूर्ण भीम आर्मी पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे 'मनुस्मृती' जाळली. 'मनुस्मृती' जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर 'मनुस्मृती' एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६). या ठिकाणीच मांडल्या गेलेल्या ठरावातला दुसरा ठराव 'मनुस्मृती'च्या संदर्भातला आहे. तो ठराव असा : "शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी 'मनुस्मृती'तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे." (बहिष्कृत भारत आणि मूकनायक : महाराष्ट्र शासन १९९०, पृ. १६३-१६७)

'मनुस्मृती' जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या 'बहिष्कृत भारत'च्या अंकातही दिलेले आहे. 'स्वराज्य' या पत्राचे संपादक रा. भुस्कुटे यांनी 'मनुस्मृती' जाळण्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र बाबासाहेब आंबेडकरांना पाठविले होते. त्यातील आक्षेपांना बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – "आम्ही जे 'मनुस्मृती'चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली." (पृ. १५८ : २)

'मनुस्मृती' या नावाचे एक पुस्तक जाळणे, 'मनुस्मृती' या नावाची एक प्रत जाळणे, हा 'मनुस्मृती' जाळण्यामागचा उद्देश नाही. 'मनुस्मृती' जाळणे याचा अर्थ मनुस्मृतीने लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळणे असा आहे. 'मनुस्मृती'ने लोकांच्या मनावर उच्चनीचतेचे संस्कार केलेले आहेत आणि या संस्कारापासून ती लोकांना मुक्तच होऊ देत नाही. या देशातील लोकांची मने 'मनुस्मृती'ने विषमतेशी पक्की बांधून ठेवली आहेत. त्यामुळे लोकांना समता ही गोष्ट अस्तित्वात असू शकते असे वाटतच नाही. म्हणूनच 'मनुस्मृती' जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे होय. याप्रकारे लोकांची मने बदलणे, लोकांचे मानसशास्त्र बदलणे अर्थात मनांतर करणे हा 'मनुस्मृती' जाळण्यामागचा उद्देश आहे. समता जाळणारा हा ग्रंथ जाळणे, लोकांची माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळणे, हा 'मनुस्मृती' जाळण्यामागचा उद्देश आहे असं डॉ. यशवंत मनोहर यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News