लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जागावाटपासंदर्भात होणाऱ्या बैठकांमधून समाधानकारक तोडगा निघत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबत युती होऊ शकणार नाही याची अगदी शेवटच्या टप्प्यात घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला राज्यात ७ जागांवर पाठिंबा देऊ अशी घोषणा केली, तर काँग्रेसनेही वंचित आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यातून आंबेडकरांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांना लोकसभेवर पाठवण्याची तयारी केल्याचे संकेत दिसत आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले.
काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याची आंबडकरांनी भूमिका घेतली असेल तर अकोल्याच्या जागेविषयी फेरविचार व्हावा अशी आमच्या अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची मागणी आहे. आम्ही त्यांचे विचार काँग्रेस हायकमांडला कळवले आहेत. त्यावर विचारविनिमय होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे, असं विजय वडेट्टीवर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. वडेट्टीवरांच्या या वक्तव्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाण्याची चर्चा आहे.
अकोल्यातून काँग्रेसचा उमेदवार नसणार
काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांचं नाव अकोला लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे ते ४ एप्रिलच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे, पण सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसकडून पाटील यांना दिली जाणारी उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तशा पध्दतीच्या अंतर्गत हालचाली काँग्रेसमध्ये सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी वंचितची भूमिका स्पष्ट करताना उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पण त्यांनी काँग्रेसवर कसलीही टीका केली नसल्यामुळे काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात पडद्यामागे बरच काही ठरलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
अकोल्यातून आंबेडकर मैदानात उतरणार
अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इतर दुसरा कुणी नसून स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले आहेत. त्यांनी रविवारीच वंचितच्या ११ लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामुळे वंचितच्या राज्यातील उमेदवरांची संख्या १९ वर पोहोचली आहे.
दरम्यान, अकोला मतदारसंघाच्या मुद्द्यावरून नुकताच काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले होते की, अकोल्यात मला पाडण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ३ वेळा मुस्लीम उमेदवार दिला. परंतु आता तेथील मुस्लिम मतदारांनी दोन्ही काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशी भुमिका घेतल्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असं आंबेडकरांनी यावेळी सांगितलं.