काँग्रेस बंजारा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत ; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
अनुसूचित जातींसाठी आरक्षण हा कर्नाटकातील वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा भागातील बंजारा समाजाकडून विरोध प्रदर्शित करण्यात आला.
अनुसूचित जातींसाठी आरक्षण हा कर्नाटकातील वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा भागातील बंजारा समाजाकडून विरोध प्रदर्शित करण्यात आला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते येडियुरप्पा यांच्या घरावर यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. अखेर पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “सदाशिव आयोगाच्या अहवालासंदर्भात आंदोलकांनी काही गैरसमज बाळगला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. याबाबत मी लवकरच बंजारा समाजाच्या नेत्यांशी बोलणार आहे. गेल्या 50 वर्षांपासून मी शिकारीपुरा प्रदेशाचा नेता म्हणून काम केले आहे. शिकारीपुरा बांधण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे," असा दावा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केला. आंदोलकांवर यापुढे कोणतीही कारवाई केली जाणार नाही, आणि पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले. काँग्रेस बंजारा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. "काँग्रेस निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय खेळात गुंतली आहे. काही काँग्रेसजन बंजारा समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. येडियुरप्पा यांच्या घरावर आजच्या दगडफेकीच्या घटनेला काँग्रेसही जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शुक्रवारी कर्नाटकातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा नवीन मसुदा जाहीर केला. या मसुद्यात अनुसूचित जातीचे १७ टक्के आरक्षण एससी डावे, एससी उजवे, एसटी आणि इतर मागास जातींना देण्यात आले आहे. बंजारा समाज राज्य सरकारच्या निर्णयाशी असहमत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला बंजारा समाजाकडून विरोध करण्यात येत आहे.