काँग्रेसचा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर; चंद्रकांत हंडोरे यांना संधी.
काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्यातून आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारीची संधी दिली आहे. हंडोरे हे महाराष्ट्रातील दलित समाजातील नेते म्हणून ओळखले जातात. मागच्या वेळच्या निवडणूकीत देखील काँग्रेसने हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी झालेल्या क्रॉस मतदानामुळे हंडोरे यांना निवडणूकीत अपयश आले होते, परंतू यावेळी हंडोरे यांना पून्हा तीच संधी देण्यात आली असून आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे देखील निवडणूकीचे गणित मांडताना काँग्रेसचा कस लागणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी विधीमंडळातील संख्याबळ पाहता भाजपचे 3, एकनाथ शिंदे यांचा 1,अजित पवार यांचा 1 यांचा एक उमेदवार निवडून येईल, तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे, मात्र भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता असल्यामुळे यावेळी देखील आमदारांच्या गुप्त मतदानामध्ये गडबड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.