राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे कुटुंबावर हल्ला कऱण्याची हिंमत कुणात नाही, कुणी जर अंगावर आला तर त्याला चिरडून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. कोरोना निर्बंधांमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कमी लोकांमध्ये षण्मुखानंद सभागृहात पार पडला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला केला. आमचा आवाज कुणीच दाबू शकत नाही, आणि आपला आवाज दाबणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सुनावले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाचे जे दाखले दिले आहेत, त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. देशातील सर्व लोकांचा डीएनए एकच आहे असे जर भागवत म्हणत असतील मग दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज वेगळे आहेत का, लखीमपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांची हत्या केली गेली ते वेगळे आहेत, का असालही त्यांनी विचारला.
शिवसैनिकाला मुख्यमंत्री कऱणार
सीबीआय आणि ईडीचा वापर करुन दबाव टाकण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा द्या, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नशिबात नव्हते म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळेच दिलेले वचन ते विसरले असा टोलाही लगावला. बाळासाहेब ठाकरे यांना आपण वचन दिले होते म्हणून आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारले, पण अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला जातो, तर उत्तर प्रदेशात काय लोकशाहीचा मळा फुलला आहे का, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.
महिला अत्याचारांवर संसदेचे अधिवेशन बोलवा
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप विरोधक करत असतात. राज्यपालांनी विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. पण देशातच महिलांवरील अत्याचार वाढले आहेत मग सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.