औरंगाबाद सभा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निशाण्यावर नेमकं कोण?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सक्रीय झाले आहेत. तर बीकेसी येथील सभेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मात्र यात उध्दव ठाकरे यांचा निशाणा कोणावर असा सवाल चर्चिला जात आहे.

Update: 2022-06-08 03:06 GMT

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज औरंगाबादला सभा होत आहे. यापार्श्वभुमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर ही सभा रेकॉर्डब्रेक होईल, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यासह औरंगाबादचा पाणीप्रश्न पेटवला आहे. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी संभाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने हजारो झेंडे मागविले आहेत. तर शिवसैनिकांसाठी नियमावलीही जारी करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या नामांतरावर उध्दव ठाकरे बोलणार?

मनसेच्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मुख्यंमत्री उध्दव ठाकरे म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो. मग नामांतराची गरज काय? पण उध्दव ठाकरे तुम्ही महात्मा गांधी आहात का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर टीका केली होती. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना आणि राज ठाकरे यांना उत्तर देणार का? असा सवाल चर्चेत आहे.

औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादचा पाणीप्रश्न तीव्र होत चालला आहे. तर सध्या हा प्रश्न प्रचंड तापला आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरून औरंगाबादमध्ये महापालिकेतील सत्तेत असलेल्या शिवसेनेची सर्वच पक्षांनी नाकाबंदी केली आहे. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये जलआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती. तर पाण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील सभेच्या माध्यमातून विरोधकांना काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News