फोन टॅपिंग : महाविकास आघाडीत मिठाचा खडा, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर आरोप करुन राष्ट्रवादीलाही टार्गेट केले आहे. आपण स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते आपल्यावर लक्ष ठेवून असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन आपले फोन टॅप केले जातात असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळा इथे काँग्रेस कार्यकर्त्याँशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.