मर्द असाल तर समोरुन हल्ला करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपला ओपन चॅलेंच
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, केंद्रीय यंत्रणाच्या कारवायांवरुन तीव्र संताप व्यक्त करत मर्द असाल तर समोरुन हल्ला करा, असं ओपन चॅलेंज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री फारसे आधिवेशनात सहभागी झाले नव्हते. आज विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही भाजपाला घेरले.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना एकाच वेळी उत्तर देणे शक्य नसले तरी याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांडलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेणार नाही. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संविधानिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊ शकतात, पण राज्याची संस्कृती आहे प्रथा-परंपरा आहे. राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरु केल्यानंतर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता.
राज्यपाल काय बोलत आहेत ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होते. त्यावेळी केलेला दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले. राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज्यपालांनी माझे शासन समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते असे राज्यपालांच्या भाषणात होते. पलीकडे राज्य ज्यांनी भाषण होऊ दिले नाही त्यांचे असल्यामुळे राज्यपालांना बोलू दिले नाही की काय हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोविडमध्ये ऑक्सिजनची कमी असताना तो कसा मिळवला, केंद्राने हजारो किलोमीटरवरुन ऑक्सिजन आणायला लावला हे राज्यपालांच्या अभिभाषणात होते. रिकामे टॅंकर एअरलिफ्ट करुन रस्त्याने, रेल्वेने ऑक्सिजन मागवण्यात आला. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा कार्यरत होती याचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. यंत्रणेला आपण कसे वागवत आहोत त्याप्रमाणे काम करत असते असंसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
शिवभोजन थाळीतून १० रुपयांमध्ये जेवण देत आहोत ही अभिनाची गोष्ट आहे. गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळवून देत आहोत हे मोठे काम आपण करत आहोत. काही लोक आरश्यात बघितली तरी भ्रष्टाचार झाल्याचे म्हणतात. कारण त्यांच्या मते तो आरसा बनवण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का?
ज्यांसाठी हे करत होत ते या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत याचेसुद्धा मला समाधान आहे. माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये माझी उणिव न भासू देता सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केले त्यांच्याबद्दलही मला समाधान व्यक्त करायचे आहे. जे झाले आहे ते झोलेले आहे आणि नाकारण्याचा नाकर्तेपणा कोणी करु नये. सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळत आहे. आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का? देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत.
आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची
तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. आपण केलेला विकास राज्यपाल सांगत होते तो आपण समोर येऊ दिला नाही. याची दखल नागरिक घेत असतात. रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता. पण काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दाऊद प्रकरणावरून भाजपवर निशाणा
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या गँगशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने अधिवेशन काळात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच राज्य सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'भाजपकडून महिनाभर दाऊद एके दाऊद करण्यात आलं. राज्यात जी चांगली कामे सुरू आहेत ती काही लोकांना दिसत नाही. काही लोकांना आरशामध्ये बघितलं तरी भ्रष्टाचार दिसतो,' असा टोला मुख्यमंत्र्यांना भाजपला लगावला आहे. हिम्मत असेल तर ओसाबा बीन लादेन सारखं हुडकून काढा आणि शिक्षा द्या असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, करोना काळात आपली यंत्रणा रात्रंदिवस काम करत होती, मुख्यमंत्री म्हणून मला याचा अभिमान आहे. कोव्हिड काळात आपण मोफत जेवण दिलं, ८ कोटी शिवभोजन थाळ्यांचं आपण आजपर्यंत वितरण केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शासनाने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
ईडी आहे की घरगडी?
टीका करणे आम्ही समजू शकतो. परंतू, सत्ता मिळविण्यासाठी एकमेकांच्या कुटुंबांची बदनामी करण्याचा जो प्रकार सुरु आहे तो अतीशय निंदनीय आणि नीच प्रकार आहे, अशा सडेतोड शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर प्रहार केला. आज सत्ता नसल्याने विरोधकांचा जा जीव जळतो आहे. जर तुम्हाला सत्ताच हवी असेल तर मी येतो तुमच्या सोबत. टाका मला तुरुंगात. ज्या ठिकाणी कृष्टाचा जन्म झाला तशा तळघरातील तुरुंगातही मी जायला तयार आहे. मी कृष्ण नाही. हे सांगायला मी तयार आहे. पण तुम्ही कंस नाही हे आगोदर तुम्हाल सिद्ध करावे लागेल. आज काही लोक केंद्रीय तपास यंत्रणांचे दलाल आहेत की प्रवक्ते हेच कळायला तयार नाही. आगोदर हे लोक आरोप करतात. मग त्याची चौकशी लागते. तत्पूर्वी हे लोक आमका तमका तुरुंगात जाणार असे सांगतात. पुढे तो तुरुंगात जातो. हा प्रकार निंदनीय आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणा इतक्या कुचकामी आहेत का?
काही चुकत असेल तर टीका करा. टीका आणि बदनामीला आम्ही घाबरत नाही. परंतू, आपण जी कुटुंबीयांची बदनामी करता आहात ते चुकीचे आहे. आज अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांना थेट दाऊदचा हस्तक ठरवले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा इतक्या कुचकामी आहेत का? ज्यांना दाऊदचा माणूस महाराष्ट्रात आमदार होतो. निवडून येतो. मंत्री होतो आणि केंद्रीय तपास यंत्रणांना हे माहित नसतं. तेही अनेक वर्षे? पहाटेच्या शपथविधीचे सरकार विधिमंडळात टीकले असते तर आज आपण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? असा थेट सवाल विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.
मी कडवट हिंदुत्ववादी आहे
काही न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. मी प्रामाणिकपणाने सांगतो की, देशद्रोहांच्या विरोधात आम्ही आहोताच आणि त्याच्याबद्दल कुठेही दुमत होण्याचं कारण नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.काश्मीरमध्ये जेव्हा तुम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेत बसला होता. पण जेव्हा अफजल गुरूला फाशी देण्याचा मुद्दा आला तेव्हा मेहबुबा मुप्था यांचं काय वक्तव्य होतं तर अफजल गुरूला फाशी देऊ नका. तेव्हा सत्तेत भाजप त्यांच्यासोबत होता. बुरहान वाणीला मारल्यावर त्याच्या घरी या मेहबुबा मुफ्ती गेल्या होत्या. या विचारांच्या असातनाही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला होता. मी कडवड हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर तुम्ही मलाच तुरुंगात टाका
एकमेकांच्या कुटुंबाची बदनामी करणं ही विकृत गोष्ट आहे. कुटुंबावर आरोप करायचे, धाडी टाकायच्या, हे काय चाललंय? तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून तुम्ही कुटुंबाला तणावाखाली ठेवत आहात, माझ्या कुटुंबाला बदनाम करून त्यांच्यावर धाडी टाकत आहात ना? चला सगळ्यांसमोर सांगतो, मीच तुमच्यासोबत येतो. पण सत्तेसाठी नाही येणार, तर तुम्ही मलाच तुरुंगात टाका,' असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. 'मलाच अडचणीत आणायचं असेल तर थेट माझ्या अंगावर या, कुटुंबाची कशाला बदनामी करता? आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची बदनामी केली आहे का? कधी तुमच्या कुटुंबाच्या भानगडी बाहेर काढल्या आहेत का?' असा तिखट सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.