कार्टी वाह्यात वागत असतील तर त्यांच्या कानाखाली वाजवायची जबाबदारी त्यांच्या मातृसंस्थेची- उध्दव ठाकरे
मुख्यंमत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भाजपचा समाचार घेत आरएसएसला सल्ला दिला आहे.;
आगामी काळात राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तर या सभेत मुख्यमंत्री संभाजीनगरची घोषणा करणार का? असा सवाल विरोधी पक्षाकडून केला जात होता. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसला सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, भाजपने आपले हिंदूत्व दाखवण्यासाठी सभेत भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्यावर मी बीकेसी येथील सभेत बोललो की, हिंदूत्व दाखवण्यासाठी भगव्या टोप्या मग आरएसएसची टोपी काळी का? असा सवाल केला होता. त्यावरून मला अनेकांनी फोन करून तुम्ही आरएसएसवर टीका का केली? असा सवाल उपस्थित केला. मात्र त्यांना मी सांगितले की, मोहन भागवत यांनी सध्या शिवलिंगावरून जी भुमिका घेतली आहे त्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र मी आरएसएसवर टीका केली नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
तसेच यावेळी पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, जर आपली कार्टी वाह्यातपणा करत असतील तर त्यांच्या कानाखाली वाजवायची जबाबदारी मातृसंस्थेची नाही का? असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी आरएसएसला सल्ला दिला.