सध्या देशात पाच राज्यांचे निवडणुका सुरु असताना महत्वाच्या पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.त्यातच देशातील सर्व विरोधक सत्ताधारी म्हणजेच भाजपाच्या विरोधात एकवटतं आहेत.त्याचसंदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असल्याचे संकेत दिले होते.या पार्श्वभूमीवर 'केसीआर' यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी वर्षा बंगल्यावर दोघांमध्ये तब्बल अडिच तास चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार यांच्यासह अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी पक्षांची आघाडीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे देखील दिसले. यानंतर दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर माहिती झाली. आज देशाचे राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची अवस्था अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमची चर्चा झाली. जवळपास सर्वच विषयांवर आमची सविस्तर चर्चा झाली आणि एकमत देखील झाले, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले.
केसीआर म्हणाले, लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व जण भेटू आणि पुढील दिशा ठरवू. पण एक आंदोलन नक्की उभे करु. देशाला बदलाची गरज आहे. देशाच्या वातावरणाला खराब होवू द्यायचं नाही. अन्य लोकांशी आम्ही बोलू. पण महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो असे त्यांनी सांगत छत्रपती शिवाजी महाराजाच्या लढ्याचा संदर्भही दिला.
राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान साधले आहे. त्यांनी केंद्रातल्या भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली. संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसारले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
के सी आर यांनी यापूर्वीच ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते.राव म्हणाले होते की ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता.त्यांनी मला बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.आपण हैदराबादला येऊ असे सांगितले.त्यामुळे ममता बॅनर्जीही लवकरच हैदराबादला भेट देऊ शकतात.
बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे. घटनेने दिलेले राज्यांचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ठाकरे यांनी राव यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सध्या 'केसीआर' तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत