जनता भाजपची सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही:शरद पवार
"सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही" असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला.
"सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही" असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना विरोधातील अडीच वर्ष लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचे आवाहन केले.
संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजुला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली तर ती एका हातात जाते ती सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेक लोकांच्या हातात जाते. मात्र हल्ली केंद्रातील सरकार केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला अगोदर कधी माहीत नव्हत्या त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा कॉंग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे असेही शरद पवार म्हणाले.
यावेळी आणीबाणीची आठवण शरद पवार यांनी सांगितली आणि त्यात १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते असेही स्पष्ट केले.
आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाददुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल असेही शरद पवार म्हणाले.
पाऊस कमी झाल्यावर आपल्याला जोमाने अडीच वर्षे काम करायचं आहे. लोकांशी संपर्क करायचा आहे, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि ही आंदोलने सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून करावी आणि त्यामूळे आपल्या पक्षाला वेगळे भवितव्य पाहायला मिळेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटना म्हणून आपल्याला कष्ट करायचा हा कालखंड आहे. पक्षाची स्थापना १९९९ ला केली. आजपर्यंत पक्षाचा २३ वर्षाचा कालखंड झाला. यामध्ये साडेसतरा वर्षे सत्तेत आपण होतो. यामध्ये भाजपकडे किती वर्ष होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सोडला तर जास्त काळ भाजप सत्तेत नव्हता. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो. सत्ता असताना अधिकार्यांची एक साखळी लक्षात येते मात्र विरोधात असताना एखादा निर्णय घेतला असेन तर तो आपल्याला जातायेताना पहाता येतो असेही शरद पवार यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाच्याबाबत आज कोर्टाने निकाल दिला आहे. निवडणूकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत तिथे निवडणूका घ्या आणि भरले नाहीत तिथे घेऊ नका असा निर्णय दिल्याचे कळतेय. त्यामुळे आता निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला घेऊन निवडणूका झाल्या पाहिजेत ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे. आणि त्यातून नगरपालिका, नगरपरिषद या सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिल असेही शरद पवार म्हणाले.
आगामी नगरपरिषद, नगरपालिका निवडणूकात नेतृत्वाची फळी तयार करण्याची व सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. यावेळी ५० टक्के नवीन तरुण पिढी घ्या त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणूका कशा लढणार आहोत याचा निर्णय पक्ष नक्की घेईल. पक्षाने निर्णय घेतला की तिकडे सगळं लक्ष केंद्रीत करावं लागेल. आपले ५४ आमदार आणि शिवसेनेचे ५६ तर कॉंग्रेसचे ४४ अशी परिस्थिती होती. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करुया असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
पक्षाची लाईन घेऊन काम करा. हे सांगतानाच कामाची जबाबदारी विकेंद्रीकरणाप्रमाणे करुया. प्रत्येक जिल्ह्यात काय काम करायचं याची माहितीही यावेळी शरद पवार यांनी दिली.इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली परंतु राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.
देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही मात्र पवारसाहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं - जयंत पाटील
मागील पाच वर्ष विरोधात काढली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही व पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही मात्र पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन केले व कृतीतून दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही हा विश्वास निर्माण केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
आता अडीच वर्षे विरोधी पक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे बजावली तर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी एकंदरीत राज्यातील जिल्हयांचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.
उद्याच्या काळात आपल्याला यश मिळवायचे आहे - अजित पवार
उद्याच्या काळात आपल्याला यश मिळवायचे आहे. आता सरकार नाहीय. महागाई, बेरोजगारी वाढतेय याविरोधात आपल्या महिला आंदोलन करत आहेत. तशाच पध्दतीने त्या - त्या भागातही आंदोलन करायला हवे. केंद्रसरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी वाढवला आहे. हा फटका गरीब जनतेला बसणार असून या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.नवीन सरकारचे अधिवेशन १८ जुलैला सुरू होणार होते. मात्र १८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यामुळे ते होईल परंतु सरकार जिथे चुकत असेल तिथे ठोकून विचारु असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.
राज्यात कुठल्याही निवडणूका लागल्या की आपण तयार असले पाहिजे. मग त्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूका करा किंवा ताकद असेल तर तिथे एकट्याची ताकद दाखवा. भाजपचा पराभव करायचा असेल तिथे एकत्र आले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.दरम्यान चांगल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष उभा राहिल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल - छगन भुजबळ
बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओकेमध्ये आहे अशी भाषणाची सुरुवात करत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.आडनावावरून नोंदणी करु नका तरी केली गेली. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी ५४ टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. 'गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही' असाही शायरीतून छगन भुजबळ यांनी इरादा स्पष्ट केला.
निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी.आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत हाही किस्सा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी सांगितला.पैसे देऊन जाणारे आहेत त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावे असे देशातील लोकांना वाटत आहे हेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आवर्जून नमूद केले. नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडलं होतं. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली हा एकप्रकारे अन्याय झाला आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दादा यांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल असा विश्वासही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला.यावेळी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षकांनी आपली मते, विचार व्यासपीठावर मांडली.