मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे; “मराठा आंदोलनाचा मूकनायक” - संजय परब
मुंबई : आरक्षणाच्या बहुतांशी सर्व मागण्या मान्य झाल्याने सकल मराठा आंदोलनाचा अखेर मोठा विजय झाला आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत आज मराठ्यांच्या घराघरात दिवाळी साजरी होणार आहे. मराठे तहात जिंकतात, मात्र युद्धात हरतात, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र यावेळी युद्ध करणारे आणि तह करणारे सुद्धा मराठे असल्याने, यात कोण जिंकणार? असा लाखमोलाचा सवाल होता. यात शेवटी मनोज जरांगे पाटील यांचा विजय झाला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा महाविजय झाला असून ते “मराठा आंदोलनाचे मूकनायक” ठरले आहेत.
“एक मराठा लाख मराठा”, अशा घोषणा देत सकल मराठा आंदोलन आरक्षणासाठी गेले आठ वर्षे सतत आंदोलन करत असून या आंदोलनाचे लाखा लाखांचे मोर्चे अक्षरशः थक्क करणारे होते. महिला, तरुणांचा मोठा सहभाग असलेले हे मोर्चे लाखांच्या संख्येने रस्तावर उतरून सुद्धा अतिशय शिस्तबद्ध निघाले, कुठे गालबोट लागले नाही. एखाद्या मोठ्या आंदोलनात असं चित्र फार विरळ दिसतं. या आंदोलनाला कोणी एक ठोक चेहरा नव्हता. पण, बीडमधील आंतरवाली जराठीसारख्या एका खेडेवजा गावातील एक सामान्य शेतकरी, साध्या सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास एक फाटका माणूस जरांगे हा या आंदोलनाचा नायक झाला आणि मुंबईत यायच्या आत त्याच्या हातात आरक्षण पडावे, एवढा हा प्रवास वरवर दिसतो तेवढा काही सोपा नाही. या फाटक्या माणसाच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे होते!
“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब मराठ्याची कल्पना आहे. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि तो शब्द मी पूर्ण केला आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज आमच्या आनंद दिघे साहेबांची जयंती आहे. बाळासाहेबांची जयंती २३ तारखेला झाली. या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील आमच्या पाठीशी असल्याने हे शक्य झाले”. शिंदे यांचे हे आज दिनांक 27 जानेवारी 2023चे मराठा विजयी मेळाव्यातील शब्द खूप काही सांगून जाणारे आहेत.
जे देवेंद्र फडणवीस यांना जमले नाही, जे उध्दव ठाकरे यांना जमवता आले नाही आणि ज्यांना करता आले असते ते शरद पवार आणि अजित पवार हे कायम दोन हात लांब राहिले ते शेवटी ठाणेकर शिंदे यांनी करून दाखवले. आधी एक प्रवाह होता की या आंदोलनामागे शरद पवार असावेत. ते हे आंदोलन चालवून मराठ्यांची मते आपल्या पारड्यात जमा करत आहेत. पवार यांची सार्वजनिक भूमिका ही पुरोगामी आणि जातीभेदाच्या पलीकडे असली तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पर्यायाने जेव्हा त्यांचे सरकार असते तेव्हा पहिल्या फळीतले नेते हे मराठाच असतात. महाराष्ट्रात सर्वाधिक मते ही मराठा समाजाची असून ती विभागली असली तरी ती बऱ्यापैकी संख्येने राजकारण आणि सहकार यांच्या माध्यमातून पवार यांच्याकडे जातात, हे कोणीच नाकारू शकत नाही. असे असूनदेखील पवार यांना कधीच मराठा आरक्षण द्यावेसे वाटले नाही. याचे पहिले कारण म्हणजे आपला पुरोगामी चेहरा कायम ठेवत त्यांना राज्य करायचे होते. मराठे हे राज्य चालवणारे असून त्यांना आरक्षण कशाला, यावर ते कायम ठाम राहिले. विशेष म्हणजे राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून निवडणुका जिंकण्याचे गणित हे काँग्रेसच्या काळात चालत होते आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा तीच री ओढली. आता भाजपसह इतर पक्ष सुद्धा हा सत्ता आणि पैशाचा खेळ करत आहेत. यात मराठा आरक्षणाला कोण विचारणार?
भाजपला म्हणजे फडणवीस यांना मराठा मतांचा खूप काही फायदा होत असल्याचे दिसत नसल्याने मराठ्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा ओबीसी मतदार आपल्या बाजूने वळवण्यात फडणवीस यांना गेल्या एक दशकापासून यश मिळत आहे. मात्र भाजप असो की संघ या दोघांना मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यात कधीच फारसा रस नव्हता. मराठा ही राज्यकर्ता जमात असल्याने त्यांना मोठे करून काही फायदा नाही. उलट यापुढे ओबीसीच्या मदतीने तीन टक्के ब्राह्मण हेच राज्यकर्ते असतील, हे संघाचे सूत्र भाजप पुढे चालवताना दिसत असल्याने मराठा आंदोलन फडणवीस मुख्यमंत्री असताना कायम लटकत राहिले. भाजपबरोबर सत्तेत असून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर अजिबात काही करता आलेले नाही. कुठलाच निर्णव धाडशीपणे वेळेत न घेण्यात तर उध्दव ठाकरे यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. मुख्यमंत्री असताना मातोश्री आणि वर्षाच्या बाहेर न पडलेले उध्दव कोरोनाचे कारण देत असले तरी फक्त आदेश देत घरी बसायची सवय असलेल्या उध्दव यांना मराठ्यांची दुःख कशी दिसणार? हे उघड सत्य होते.
हे सर्व जवळून बघितलेल्या शिंदे यांना मराठा आंदोलनाचा चेहरा झालेल्या जरांगे पाटील यांच्या निमित्ताने आपला माणूस सापडला. मातोश्रीची शिवसेना फोडून नवे शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री झालेल्या शिंदे यांच्यासाठी हीच वेळ होती की त्यांना ठाणे, मुंबई आणि कोकणाच्या बाहेर आपल्या अस्तित्व दाखवण्याची. पन्नास खोके, एकदम ओके आणि मिंधे सरकार या आरोपातून बाहेर पडत स्वतःची ओळख निर्माण करण्याची. उध्दव ठाकरे यांचे सहानभूतीचे पारडे जड होत असताना निवडणुकीच्या लढाईत आपला टिकाव कसा लागणार अशी चिंता असताना त्यांना जरांगे यांच्या माध्यमातून आशेचा किरण लाभला. छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेडगे ही फडणवीस यांची बी टीम जरांगे यांच्याविरोधात रान उठवून मराठा आरक्षणाला खो घालत असल्याचे चित्र उभे असताना जरांगे यांच्या मागे उभा असलेला आणि न दिसणारा चेहरा होते एकनाथ शिंदे! आता त्यांनी किती मदत केली, काय मदत केली, कोणाच्या मार्फत मदत केली, याचा शोध घेतला तर हाती काहीच लागणार नाही. याचा कोणीच हिशोब ठेवत नाही. आज साधा दहा, पन्नास माणसांचा मोर्चा काढायचा ठरवला तर लाखो रुपये लागतात. मराठा तर लाख लाख संख्येच्या घरात रस्त्यावर होते. त्यांचे जेवणखाण, त्यांच्या गाड्या, त्यांचे मोर्चे, त्यांच्या सभा, त्यांची मैदाने, त्यांचे मंडप, त्यांचे जेसीबी, त्यांचे हारतुरे… अशा आणि आणखी काही कोटी कोटी रुपयांच्या गोष्टी कोणी दिल्या आणि आल्या कुठून? असा प्रश्न पडतो तेव्हा मागे कोणी तरी उभा असतो. मराठ्यांनी, मराठ्यांकरिता हे आंदोलन चालवले असले तरी हे दिसते तितके सोपे नाही आणि हेच शिंदे यांना हवे होते.
मराठ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आरक्षण मिळाले, हा संदेश आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला आहे. आता या मिळालेल्या आरक्षणाची चिरफाड होईल. कोण जिंकले कोण हरले यावर युक्तिवाद होतील. पण, एक गोष्ट झाली ती म्हणजे सर्व काही शिंदे यांच्या मनासारखे झाले आहे. मराठ्यांचा नवा “मसिहा” ही त्यांची नवीन ओळख झाली आहे. मुख्य म्हणजे नवा जनाधार त्यांना मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते. त्यांचा शिष्य सुद्धा त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, हे शिवसैनिक जोराने सांगत मैदानात उतरतील तेव्हा शिंदे यांचा पाया भक्कम झालेला असेल. याचा निवडणुकीत किती फायदा होतो, हे येता काळच ठरवेल. शेवटी एक : शिंदे काय करत आहेत, यावर मोदी आणि शहा बारीक नजर ठेवून आहेत. गेल्या दोन वर्षांत तुम्हा आम्हाला न दिसणाऱ्या एका स्थळी शिंदे आणि भाजप पक्षश्रेष्ठी एकमेकांसमोर बसले असतील तेव्हा मराठा आरक्षण आणि मते यांची बेरीज झाली असेल. ती बेरीज होत असेल तेव्हाच “मूकनायक”ला हिरवा कंदील मिळाला असेल आणि ठाणेकर पुढे निघाले असतील.