छत्तीसगडः राज्यसभा २ जागेसाठी, कपिल सिब्बल, पी चिदंबरम यांच्यासह अनेक दिग्गज दावेदार, कोणाला मिळणार तिकिट?
छत्तीसगड मधील राज्यसभेच्या २ जागांसाठी आगामी जून महिन्यात निवडणूका होणार आहेत. छत्तीसगड मध्ये काॅग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे काँग्रेस मधील अनेक दिग्गज नेते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये छत्तीसगड काँग्रेस मधील नेत्यांबरोबरच काँग्रेस चे केंद्रीय नेते देखील इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि छत्तीसगढ़ विधानसभेचे अध्यक्ष डॉ. चरणदास महंत हे देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे विश्वासू गिरीश देवांगन, बघेल यांचे सल्लागार विनोद वर्मा, राष्ट्रीय सचिव राजेश तिवारी देखील इच्छुक आहेत. मात्र, या सोबतच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांचे नाव देखील टाॅपला आहे.
जून मध्ये काँग्रेस च्या छाया वर्मा आणि भाजपचे रामविचार नेताम यांचा राज्यसभेचा कार्यकाल पूर्ण होत आहे. गेल्या वेळेला राज्यसभेची एक जागा काँग्रेस च्या वाट्याला आली होती. मात्र, विधानसभा सदस्य संख्या वाढल्याने काँग्रेस या ठिकाणी दोन जागांवर विजय मिळवू शकते. मात्र, आता सामना भाजप विरूद्ध काँग्रेस असा नाही. आता सामना काँग्रेस च्या अंतर्गतच आहे.
छत्तीसगड भाजपच्या नेत्यांच्या मते राज्यातील नेत्यांनाच संधी दिली जाईल. मात्र, पी चिदंबरम आणि कपील सिब्बल यांचे नाव समोर आल्यानं छत्तीसगडमधील इच्छुक उमेदवार नाराज होऊ शकतात.
कपिल सिब्बल यांना संधी दिली जाणार का?
कपिल सिब्बल हे जी 23 गटाचे काँग्रेस नेते आहेत. ते सतत काँग्रेस नेतृत्वावर टीका करत असतात. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व सिब्बल यांना राज्यसभा देऊन संतुष्ट करू शकते. दुसरीकडे काँग्रेस मध्ये बघेल यांचे वजन वाढलं आहे. त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत प्रियांका गांधी यांच्या सोबत काम केलं आहे. त्यामुळं काँग्रेस नेतृत्व भूपेश बघेल यांच्या सल्ला नक्कीच घेईल.