शिवसेना - तेलंगणा भाऊ भाऊ काय? नारायण राणे यांचा टोला

Update: 2022-02-21 07:21 GMT

भाजपविरोधी आघाडी तयार करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. देशातील वातावरण गढुळ झाले असुन खालच्या पातळीवरचे सुडाचे राजकारण सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला चिमटे काढले आहेत. "महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत. तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ मिळेल ते मिळून खाऊ ! सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी बजाव पुंगी ! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!" असा टोला त्यांनी लगावला आहे.

नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राज्यात रंगला आहे. एकीकडे नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर कारवाईची तयारी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेने केली आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी सुशांत सिंह आणि दिशा सालियान यांच्या हत्यांमागे कोणता मंत्री आहे, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे शिवसेनेला इशारा देत आहेत.

Tags:    

Similar News