हेच आशिर्वाद कामी येतात. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट झाली वायरल
मंत्री येतात आणि जातात परंतु त्यांची ओळख त्यांच्या कामाने कायम राहते.. माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं म्हाडा आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं गृहस्वप्न साकार झाल्याबद्दल आ.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहित आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत...;
मंत्री येतात आणि जातात परंतु त्यांची ओळख त्यांच्या कामाने कायम राहते.. माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं म्हाडा आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं गृहस्वप्न साकार झाल्याबद्दल आ.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट लिहित आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत...
डॉ. जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट..
आज पासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात होणार आहे. आज 11.00 वाजता टाटा कॅन्सरच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आदरणीय शरचंद्रजी पवार साहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट होते. त्यांच छोटसं ऑपरेशन झालेलं होते. मी त्यांना बघायला गेलो होतो आणि उभा राहून चर्चा करीत होतो. साहेबांच्या बाजूला वहिनी बसलेल्या होत्या आणि खुर्चीवर टाटा. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. श्रीखंडे बसले होते. सहज चर्चा करीत असताना मी डॉ. श्रीखंडे यांना विचारले की, मी काय मदत करु शकतो; कारण, मला एक खंत होती जी माझ्या मुलीने माझ्या मनात टाकली होती, ती म्हणजे कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावरच लोक झोपतात तर त्यांची योग्य ती सोय का नाही आपण करु शकत ? माझ्या मनाला देखील हाच प्रश्न भेडसावत होता आणि त्यांनीही सांगितले की, ह्या लोकांसाठी आपण काय करु शकलात तर बघा. ही चर्चा चालू असतानाच वहिनी म्हणाल्या की, जितेंद्र ह्या काम करणा-या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी देखिल आपल्याला काही करता येईल का ? ह्या दोन गोष्टी त्या दिवशी चर्चेत आल्या. मी लगेच
गृहनिर्माण सचिव श्री. म्हैस्कर, श्री दिग्गिकर आणि मुंबई म्हाडा चे मुख्याधिकारी श्री. म्हसे यांची आणि काही अधिका-यांची एकत्रित बैठक बोलावली. या तिनही अधिका-यांना मी सांगितले की, आपल्याला हे करायचं आहे. त्यानुसार कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकासाठी 100 खोल्या अगोदर दुसरीकडे उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या, परंतु त्यामध्ये काही समस्या उपस्थित झाल्या. त्यानंतर त्याच्यापेक्षाही चांगल्या खोल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बॉम्बे डाईंगच्या एका इमारतीमध्ये म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्या. तिनही अधिका-यांसहीत सर्वांनीच एकमताने या निर्णयाचे स्वागत केले की, हे समाजासाठी उपयोगी काम आहे.
त्यानंतर आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख श्री. बडवे यांच्याकडे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खोल्या अधिकृतरीत्या सुपुर्द केल्या. नंतर त्यांनी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी Patient Friendly Room तयार केल्या आणि आता उद्या त्याचे उद्घाटन होणार आहे.
मी जे महिलांसाठीच्या वसतीगृहाबद्दल बोललो होतो त्यासाठीची जागा देखिल मी बघून ठेवली होती. हाजीअलीच्या बाजूलाच एक मोठा भूखंड होता ज्यामध्ये 500 खोल्यांच्या हॉस्टेलची पूर्ण इमारत बसू शकेल आणि त्याबाबतचे डिझाईन्स देखिल अंतिम करण्यात आले होते. पण, त्यानंतर माझे मंत्रीपद गेल त्यामुळे त्याचं पुढे काय झालं हे मला माहित नाही. पण, त्यादिवशी चर्चा झालेल्या दोन्ही गोष्टी मी अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलो. मला आनंद आहे की, त्याच्यामधील कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या खोल्यांचे उद्घाटन होणार आहे.
जीवनात हिच काम आपल्याला आशीर्वादरुपाने मदत करीत असतात. अनेक संकटे येतात काही ठिकाणी माहित नसलेली माणसं देवासारखी येऊन उभी राहतात. ती कशामुळे तर हेच आशीर्वाद आपण घेतो त्याच्यामुळे.
माझी आई 2 महिन्यत कॅन्सरने गेलेली मला आठवते. कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यानंतर घरात काय अवस्था असते हे मी फार जवळून माझ्या घरात बघितलं आहे. कारण, माझ्या तीन मावश्या कॅन्सरने गेल्या. एक माझी मावशी टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमीट असताना माझी आई कशी रस्त्यावर झोपायची ही आठवण देखिल माझ्या मनात आजही कायम आहे. पण, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे मला गृहनिर्माण खाते मिळालं आणि त्यांच्याच संस्कारामुळे माझ्यात ही सगळी समाजोपयोगी कामे करण्याची मानसिकता तयार झाली.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्या असोत, काम करणा-या महिलांसाठी हॉस्टेल असो तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असो, ही तिनही म्हाडाच्या अखत्यारीत नसतांना म्हाडाचा छत्र देण्यासाठी (समाजोपयोगी उपक्रम) म्हणून उपयोग व्हावा म्हणून ही तिन्ही कामे झाली. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हॉस्टेलच्या कामाबाबत निविदा देखिल निघाली होती, त्याचे काम देखिल सुरु झालं असेल. माझी ह्या सरकारला विनंती आहे की, हाजीअलीच्या जवळ जे महिलांसाठी आपण वर्किंग वुमन्स हॉस्टेल तयार करणार आहोत त्या कामाची देखिल आपण सुरुवात करावी. ही तीनही कामे आयुष्यभर मला आशीर्वाद देत राहतील.
-डॉ. जितेंद्र आव्हाड