गेल्या काही महिन्यांमध्ये तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात आपलं राजकीय बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. त्यातच केसीआर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षात प्रवेश करून घेत पक्ष वाढवत होते. मात्र आता सहा महिन्यातच बीआरएसला मोठा धक्का बसला आहे
सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरएसमध्ये प्रवेश केलेले बीड येथील शिवराज बांगर यांनी बीआरएस भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. बीआरएसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील अस्वस्थ मंडळींना गळ घालण्यासाठी काही एजंट नेमले असून हे एजंट आर्थिक आणि राजकीय आमिष दाखवून त्यांचे प्रवेश घडवून आणत आहेत. प्रवेश देताना वेगळी भूमिका आणि प्रवेश दिल्यानंतर वेगळी भूमिका असे बीआरएसचे धोरण आहे. काही दिवसांचा अनुभव आल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रातील जनतेवर ही वेळ येऊ नये, म्हणून आम्ही वेळीच सर्वांना सावध करणार आहोत, असेही शिवराज बांगर यावेळी म्हणाले. दरम्यान शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.