राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर इडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले आहे. सांगलीमध्ये पीएनजी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गडकरी यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना त्यांनी सांगितले की, 'मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण? एक तर बायको, नाहीतर साला (मेव्हणा) आणि प्रायव्हेट सेक्रेटरी. मंत्र्यांचा पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम असं असतं. एकदा मी माझ्या मेव्हण्याला सांगितले की तुझं काम असलं तरच माझ्याकडे ये, इतर कोणाचे काम मला सांगू नकोस, उगाच नेतेगिरी करु नको" असे आपण आपल्या मेव्हण्याला सुनावल्याचे ग़डकरी यांनी सांगितले.