BMC Budget : मुंबई बाहेरील रुग्णांना ‘जादा’ शुल्क; अर्थसंकल्पातील तरतुदीला भाजपचा विरोध
मुंबईच्या बाहेरील रुग्णांकडून बीएमसीच्या रुग्णालयांत अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला राजकीय पक्षांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.;
देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गतवर्षीप्रमाणेच हा अर्थसंकल्प बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मार्च 2022 पासून इक्बाल सिंग बीएमसी प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. 59 हजार 954 कोटी रूपयांच्या या बजेटने पहिल्यांदाच विक्रमी आकडा पार केला. हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर झाल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असे महत्त्व आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 10.50 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी 54256.07 कोटींचे बजेट होते.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
• अर्थसंकल्पात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी अंतर्गत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे मुंबईकरांना मोफत आणि स्वस्त औषधे दिली जाणार आहेत.
• मुंबईच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी बजेटमध्ये 45759.21 कोटी रुपयांची तरतूद असून, कोस्टल रोडसाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद आहे.
• यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्टला 928.65 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.
स्टार्टअप प्रोक्योरमेंट पॉलिसी स्वीकारणारी BMC ही देशातील पहिली स्थानिक संस्था आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
• 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित महसूल उत्पन्न 35749.03 कोटी रुपये आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2459 कोटी रुपये अधिक आहे.
• 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित महसूल खर्च 28121.94 कोटी रुपये असेल.
यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आशिष शेलार
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेच्या बजेटवर प्रतिक्रिया दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या कर/शुल्कातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. या शक्यतेची सुध्दा चाचपणी पालिका करेल, असे सूतोवाच आजच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आले असून ही बाब आक्षेपार्ह व अन्याय कारक ठरणारी आहे. भाजपाचा याला विरोध राहिल, असं शेलार म्हणाले.