भाजप मायावती यांना राष्ट्रपती करणार, आरएसएसचा निवडणूकीत खोटा प्रचार: मायावती

Update: 2022-03-27 13:42 GMT

पराजयाच्या समीक्षा बैठकीत मायावती यांचा भाजप, आरएसएसवर गंभीर आरोप, समाजवादी पक्षाबाबतही मोठं विधान वाचा काय म्हटलंय मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत भाजपने ४०३ पैकी २५५ जागेवर विजय मिळवत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. या निवडणूकीत प्रमुख विरोधी पक्ष ठरलेल्या समाजवादी पक्षाला १११ जागेवर विजय मिळाला. कॉंग्रेस ला २ जागेवर समाधान मानावं लागलं. मात्र, भाजपच्या या ऐतिहासिक विजयात मोठा वाटा राहिला बसपाचा. एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेला बसपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. बसपाचं मतदार भाजपकडे शिफ्ट झाल्याचं या निवडणूकीत दिसून आलं. यावरुन बसपावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली.

मात्र, या निवडणूकीच्या निकालानंतर बसपा प्रमुख मायावती यांच्या उपस्थित घेतलेल्या समीक्षा बैठकीत भाजपने आणि आरएसएस ने निवडणूकी दरम्यान मायावती यांना भाजप राष्ट्रपती करणार असल्याचा खोटा प्रचार केल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. २७ मार्चला पार पडलेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली.

भाजपने निवडणूकीत जाणून बुजून भाजपचं मातृसंघटन असणाऱ्या आरएसएस च्या मदतीने बसपामध्ये खोटा प्रचार केला. या प्रचारात उत्तर प्रदेश निवडणूकीत बसपा चा पराजय झाला तरी मायावती यांना भाजप राष्ट्रपती करणार आहे. त्यामुळं भाजपला सत्तेत येण्यासाठी तुम्ही मदत करायला हवी. असा खोटा प्रचार करण्यात आल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्यासाठी राष्ट्रपती होणं ही खूप दूरची गोष्ट आहे. मी असा विचारही कधी केला नाही. या लोकांनी कांशीराम यांना देखील हा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव धुडकावला होता. अशी माहिती देखील मायावती यांनी यावेळी दिली.

समाजवादी पक्षाने या निवडणूकीत भाजपला चांगली टक्कर दिली. याबाबत देखील मायावती यांनी भाष्य केलं आहे. मुस्लीम समाजाची एक गठ्ठा मतदान घेऊन आणि वेगवेगळ्या पक्षांशी हात मिळवणी करुन देखील समाजवादी पक्षाला सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळं समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये कधीही सत्ता मिळणार नाही. तसंच समाजवादी पक्ष भाजपला कधीच हारवू शकणार नाही. मुस्लीम समाजाला नेहमी प्रमाणे सपाला मतदान पश्चात्ताप झाला आहे. त्यामुळं मुस्लीम समाजासह हिंदू समाजाला २००७ प्रमाणे पक्षाशी जोडणं गरजेचं असल्याचं मत यावेळी मायावती यांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News