देशातील दंगली भाजप पुरस्कृत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
देशात निर्माण झालेल्या दंगली या भाजपने प्रायोजिक केलेल्या असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.;
गेल्या काही दिवसात देशात अनेक हिंसाचाराचे प्रकार समोर आले. त्यावरून देशातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे संताप व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना देशातील दंगली या भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यातच द्वेषपुर्ण आणि चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे हनुमान जयंती आणि राम नवमीच्या दिवशी देशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यावरून राजकारण तापले आहे. तर त्याच मुद्द्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
देशात यापुर्वी कधीही हनुमान जयंती आणि राम नवमीला दंगली किंवा हिंसाचार झाला नव्हता, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या दंगलींमुळे देशातील वातावरण बिघडत असून देशात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार तयार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, आगामी काळात दिल्लीत महापालिका निवडणूका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर दिल्ली महापालिका निवडणकीत समोर पराभव दिसत असल्यानेच भाजपने निवडणूक पुढे ढकलली. तर दुसरीकडे महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊनच देशात दंगली भडकवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, मुंबईत भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे मुंबईत तेढ निर्माण करण्यासाठी लाऊडस्पीकरवाले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.