भाजप खासदार संजय राऊत यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजपातील संबंध ताणले गेले आहेत. तर पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच भाजपा खासदाराने संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.;
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप विरोधी पक्षांची एकजूट व्हावी, अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. त्यातच पत्रकार परिषदांमधून राऊत भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष टोकाला गेला आहे. परंतू नाराज असलेल्या भाजप खासदार वरुण गांधी यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे हा विषय चर्चिला जात आहे.
मंगळवारी वरुण गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, वरुण गांधी यांच्याशी झालेली भेट ही राजकीय भेट नव्हती. कारण वरुण गांधी हे लेखक आहेत. त्यांचा समाजाचा चांगला अभ्यास आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून भेट घेण्याचे ठरले होते. मात्र विविध कारणांमुळे भेट होऊ शकली नव्हती. मात्र काल ती भेट झाली. त्या भेटीत विशिष्ट राजकीय हेतूने कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र राजकीय गप्पा झाल्या, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणूकीच्या काळात भाजप खासदार वरुण गांधी यांनी विविध मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिला होता. तर वरुण गांधी भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे वरुण गांधी यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे,
संजय राऊत नाणार बद्दल काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाणार प्रकल्पाबाबत राज्य सरकारचे मत सकारात्मकतेने बदलत असल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील नागरीकांची भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा नाणारला असणारा विरोध मावळत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशहिताचे प्रकल्प उभे रहावेत. मात्र त्या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध होता. त्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाच्या विरोधात भुमिका घेतली होती. तसेच काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात करता येईल का? अशी मागणी केली आहे. तर समृध्दी महामार्गाच्या बाजूला अनेक जलप्रकल्प आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्याठिकाणी करता येईल का? असे मत व्यक्त केले आहे. याबाबतीत तांत्रिक बाजू तपासून त्यावर विचार होईल.
मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणातील दुसऱ्या जागेचा विचार केला आहे. हा विचार तेथील स्थानिक नागरिक, त्यांचे व्यवसाय, शेती या सगळ्या बाजूंचा विचार करून घेतला असेल, असे मत व्यक्त केले.
शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, अशी आम्ही भूमिका याआधीच मांडली आहे. तसेच शरद पवार हे बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणू शकतात, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.