रक्षा खडसे भाजप सोडणार? सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजप सोडणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी खडसे कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.

Update: 2022-05-18 05:25 GMT

सध्या राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी भाजप खासदार रक्षा खडसे तेथे उपस्थित असल्याने चर्चेला तोंड पडले आहे.

एके काळचे भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.  त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही हाती घड्याळ बांधले. मात्र सासरे आणि ननंद यांनी हाती घड्याळ बांधल्यानंतरही रक्षा खडसे या भाजपात कायम राहिल्या. मात्र आता लोकसभा निवडणूकीला दोन वर्षे शिल्लक आहेत. त्यापार्श्वभुमीवर सुप्रिया सुळे यांनी मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी भाजप खासदार रक्षा खडसे तेथे उपस्थित असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राजकीय फायद्याचा विचार करत भाजप न सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप सोडल्यास खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता असल्याने राजकीयदृष्ट्या करेक्ट विचार करत रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता निवडणूकीला अवघे दोनच वर्षे शिल्लक आहेत. तर रक्षा खडसे यांनी सुप्रिया सुळे मुक्ताईनगर दौऱ्यावर असताना भेट घेतली. त्यामुळे रक्षा खडसे भाजप सोडणार का? अशी चर्चा रंगली आहे.

मात्र या भेटीवर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी खडसे कुटूंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यामुळे झालेली भेट ही पुर्णतः कौटूंबिक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. तसेच रक्षा खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील खासदार म्हणून आम्ही अनेकदा दिल्लीत भेटत असतो. त्यातच सुप्रिया सुळे मुक्ताईनगर दौऱ्यावर असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांची भेट घेतली असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. तर रक्षा खडसे राष्ट्रवादीत जाणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी मौन राखले.

Tags:    

Similar News