किरीट सोमय्या यांचे हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप आणि त्यानंतर किरीट सोमय्यांवर झालेली कारवाई यानंतर हसन मुश्रीफ विरुद्ध चंद्रकांत पाटील असा संघर्ष रंगला आहे. कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना उत्तर दिले आहे. कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं असलं तरी ईडीला सामोरे जाणं कठीण आहे, कारखान्यात 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत त्या कंपन्या कुठे आहेत, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना विचारला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे चंद्रकांत पाटील हेच खरे मास्टर माईंड आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आपण अनेकदा शरद पवार, महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत आणि परमबीर सिंह प्रकरण, त्याचबरोबर केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं टीका केली आहे. त्यामुळेच भाजप आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आरोप सोमय्या यांनी केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आरोप केले आणि ईडीकडे तक्रार केली म्हणून आपल्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी म्हटले आहे.