चित मैं जिता पट तू हारा' ही भाजपाची दुट्टपी भूमिका!: सचिन सावंत
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे. या प्रकरणाची इत्यंभूत चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच काँग्रेसची भूमिका आहे. परंतु या प्रकरणात भाजपाची ‘चित मैं हारा, पट तू जिता,’ अशी दुटप्पी भूमिका समोर आली आहे, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.
बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंदचा राजीनामा मोदी यांनी का घेतला नाही? तसेच गुजरातमध्ये एका महिलेच्या टेहळणीसंदर्भातील ऑडीओ टेपचे प्रकरण भाजपाने का दाबले? असे प्रश्न सावंत यांनी विचारले.
यासंदर्भात बोलताना सांवत म्हणाले की, महिला अत्याचारावरील असंवेदनशीलता व बलात्काऱ्यांविषयीची भाजपाची आत्मियता अनेक प्रकरणात समोर आली आहे. यातून भाजपाचा दुट्टपीपणा, दांभिकता आणि दुहेरी मापदंड उघडे पडलेले आहेत. या संदर्भात भाजपाला उघडे पाडण्याकरीता सावंत यांनी प्रश्नांचा भडिमार केला. २०१४ साली बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंद यांना मंत्रिमंडळात का घेतले गेले आणि आरोप झाल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही ? याचे उत्तर भाजपाने द्यावे.
संजय राठोड प्रकरणी ऑडीओ टेपवरून बोंब ठोकणाऱ्या भाजपा नेत्यांनी गुजरातमधील एका महिलेची पोलिसांनी केलेल्या टेहळणी प्रकरणातील ऑडिओ टेप का दाबण्यात आली? असा प्रश्न विचारला. सदर प्रकरणात एका मंत्र्यांच्या आदेशाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने, ती महिला कुठे जाते? काय करते? याची टेहळणी केली होती. त्या प्रसंगातील ऑडिओ टेपमध्ये पोलीस आणि एका मंत्र्यांचे संभाषण समोर आले होते. त्या संभाषणातदेखील महिला, पोलीस, मंत्री याबरोबरच एक 'साहेब' देखील सहभागी असल्याचे दिसून आले होते. ते 'साहेब' कोण? हे अजूनही गुलदस्त्यातच राहिले आहे. सदर ऑडिओ टेपच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली असता ती महिला किंवा तिच्या आईवडिलांपैकी कोणीही तक्रार केली नाही, असे उत्तर गुजरात सरकारने दिले होते. त्यावेळी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही आणि ती महिला व तिचे आईवडील दबावात नसतील का? या प्रश्नाचे उत्तरही दिले गेले नाही. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे धारिष्ट्य भाजपा दाखवील का? असा प्रश्नही सावंत यांनी विचारला.
राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करताना देखील भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्यांची ऑडिओ टेप बाहेर आली होती. या टेपमध्ये तो मंत्री जाहीरपणे आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न करत होता. सदर मंत्र्याने ऑडिओ शॅम्पल दिले नाहीत व त्या टेप बोगस असल्याचा स्वतःच निर्वाळा दिला होता. भाजपाचा दुट्टपीपणा उघड करताना सावंत म्हणाले, किशोर वाघ यांची चौकशी फडणवीस सरकारने लावली, पण आता गुन्हा दाखल झाला तर मात्र तो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने केला. पण एकनाथ खडसेंवर एसीबी व झोटींग आयोगाची चौकशी लावून फडणवीस सरकारनेच क्लिन चिट दिली असताना मोदी सरकारने त्याच प्रकरणात ईडी चौकशी लावली ती मात्र न्यायबुद्दीने, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा नेत्यांना कथुआ, उन्नाव, हाथरस बलात्कार प्रकरणात देशाने पाहिले आहे. बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेलेल्या भाजपा आमदार कुलदिपसिंग सेनगरला भेटायला साक्षी महाराज गेले होते. त्या पीडित महिलेला मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न करावा लागतो, तिच्या वडिलांना ठार मारले जाते, चिन्मयानंदच्या प्रकरणी पीडित मुलीलाच अटक होते, त्यामुळे भाजपाला महिला अत्याचारांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सावंत म्हणाले.