पत्रकारांवरील धाडीचा धिक्कार असो - विरोधी पक्षनेते वड्डेटीवार
भाजपला २०२४ मध्ये पराभव दिसत असल्याने हा हल्ला विजय वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक पोर्टल आणि त्यांच्या पत्रकारांवर टाकलेल्या धाडीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री विजय वड्डेटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल चढवला आहे. आमच्या विरोधात कोणतीच बातमी देऊ नये अशी मानसिकता काही लोकांची झाली आहे. असे असताना राहुलजी भाजप वाल्यांना सांगत असतात "डरो मत डरो मत". पण भाजपावाल्यांना २०२४ चा पराभव समोर दिसतोय म्हणून अशा भ्याड धाडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला असल्याची टीका श्री वड्डेटीवार यांनी केली आहे.
दरम्यान विजय वड्डेटीवार म्हणाले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींची गळचेपी होत आहे. दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक पोर्टल आणि त्यांच्या पत्रकारांवर टाकलेली धाड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. न्युजक्लिकमधील पत्रकार हे केंद्र सरकारची पोलखोल करणारे वास्तव मांडत होते. त्यातील अनेक पत्रकार हे आधी मोठ्या वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत होते. भाजप विरोधात बातमी द्यायची नाही हा दबाव तिथे त्यांच्यावर होता. या दबावाला बळी न पडता अनेकांनी प्रामाणिकपणे आपले काम केले म्हणून त्यांना नोकरीवरून काढण्यासाठी दबाव आणला गेला, जे फार दुर्दैवी आहे. न्यूजक्लिक मधील पत्रकार हे निष्ठावंत आणि प्रामाणिक आहेत. ते कर्तव्य बजावताना थांबले नाही, त्यांनी आपले काम सुरू ठेवले. मात्र त्यांना थांबवायचं म्हणून खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र रचण्यात आले आणि धाडीची कारवाई करण्यात आली. अनेक पत्रकारांचे मोबाईल लॅपटॉप जप्त करण्यात आले. या कारवाईने २०२४ लोकसभा निवडणुकीची भाजपाची तयारी सुरू झाली असे म्हणावे लागेल, असा टोला श्री वड्डेटीवार यांनी लगावला. अदानीच्या कंपन्यांमध्ये कशा प्रकारे चीनमधील प्रभावी अब्जाधीशांची गुंतवणूक आहे. याचा खुलासा खा. राहुल गांधी यांनी केला होता. त्यावेळी सरकारने एकही कारवाई केली नाही. उलट सरकारमधील मंत्री अदानीचे प्रवक्ते बनून पाठराखण करत होते. तरी राहुल गांधी भाज वाल्यांना सांगत असतात "डरो मत डरो मत" पण भाजपावाले काय करणार २०२४ चा पराभव समोर दिसतोय, असा टोला वड्डेटीवार यांनी लगावला आहे.