ऑनलाईन PUB G खेळातून झालेली ओळख आणि त्यातून झालेल्या प्रेमाचं रूपांतर अखेर लग्नात झालं...होय पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा हैदर आणि भारतीय तरूण सचिन मीना यांच्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आहे.
सीमा हैदर ही मूळची पाकिस्तानची नागरिक आहे. तिला चार मुलंही आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. इंस्टाग्राम वर तर तिचे रील्स आणि स्टोरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. त्यातूनच तिला पाकिस्तामनमध्ये एका चित्रपटासाठी ऑफरही देण्यात आली होती. त्यासाठी तिनं ऑडिशनही दिलं होतं. मात्र, दरम्यानच्या काळातच ती बेकायदेशीररित्या नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. त्यानंतर तिला अटकही करण्यात आली होती.
दरम्यान, काही माध्यमांनी सीमा हैदर संदर्भात एक वृत्त दिलंय. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या एनडीएच्या मित्रपक्षानं रिपाइंमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच सीमा हैदरला दिल्याचं म्हटलंय. रिपाइंचे प्रवक्ते किशोर मासूम यांच्या यासंदर्भातील वक्तव्याचा आधार देतं हे वृत्त माध्यमांनी दिलंय. यासंदर्भात रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणाले,” सीमा हैदरला रिपाइंकडून निवडणुकीत तिकिट देण्याचा प्रश्नच येत नाही. तिला तिकिट द्यायचेच असेल तर आम्ही पाकिस्तानला परत जाण्याचं तिकिट देऊ”.
रामदास आठवलेंच्या या भूमिकेमुळं सीमा हैदर रिपाइं मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणार, या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळालाय.