भाजपपेक्षा कोणाचं हिंदूत्व कडवं दाखवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये स्पर्धा- असदुद्दीन ओवैसी
राज ठाकरे यांची बहुचर्चित सभा औरंगाबाद येथे झाली. तर या सभेत राज ठाकरे यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले. त्याबरोबरच सध्या देशात होत असलेल्या द्वेषाच्या राजकारणावरून खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.;
AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण पसरवले जात असल्याचे द्योतक आहे. तसेच देशात जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. त्या पक्षांकडून भाजपपेक्षा आमचं हिंदूत्व कसं कडवं हे दाखवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. तर संविधानाविरोधात बोलले जात आहे आणि त्याचा फटका देशातील मुस्लिमांना भोगावा लागत असल्याची टीका असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.
राज ठाकरे यांनी 3 मेनंतर राज्यात मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून ओवैसी यांना भोंग्यांबाबत प्रश्न विचारला असता ओवैसी म्हणाले की, राज्यात दोन भावांची भांडणे सुरू आहेत. त्यामुळे मंदिर मशिदींबाबतचा प्रश्न त्यांना विचारा, असे ओवैसी म्हणाले.
देशात मुस्लिमांविरोधात वातावरण तापवले जात आहे. तर जहांगिरपुरा, खरगोन यासह सेंदवा मध्येही मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवला जात आहे. तर ही भाजपकडून मुस्लिमांना एकत्रित शिक्षा दिली जात असल्याची टीका औवैसी यांनी केली.
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कोणाच्या घरावर बुलडोझर चालवायचा हे ठरवत असतील तर मग देशात न्यायालयांची गरजच काय? असा सवाल ओवैसी यांनी केला. तर अमित शाह आणि शिवराज सिंह चौहान हे स्वतः न्यायाधीश बनत असल्याची टीका ओवैसी यांनी केली.