छगन भुजबळांविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी- अंजली दमानिया
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके फोत जल्लोष केला. पण याप्रकरणी छगन भुजबळांविरोधात कोर्टात लढा देणाऱ्या अंजली दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
निकालाची प्रत हाती न आल्यामुळे यावर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भुजबळांनी केलेला घोटाळा मोठा आहे असा दावा त्यांनी केला आहे. छगन भुजबळांविरोधात ७ घोटाळे आणि सुमारे २ हजार ६५३ कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची तक्रार आपण केली होती. त्यापैकी महाराष्ट्र सदन प्रकरणी १ आरोप होता, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र सदनच्या फर्निचरचे काम भुजबळ यांच्या सुनेच्या कंपनीला कसे मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.