अखेर किरीट सोमय्या यांच्या आरोपांना अनिल परब यांचे उत्तर
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टवरून गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.;
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टप्रश्नी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच अनिल देशमुख, नवाब मलिक तुरूंगात आहेत. त्यांच्यापाठोपाठ अनिल परब यांनीही बॅग भरण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला होता. मात्र त्यावर आता अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. ते लोकसत्ता डॉट कॉमवर घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अनिल परब म्हणाले, बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही. कुणीही बॅग भरुन जेलमध्ये ट्रीपला जात नाही. जर मी गुन्हेगार असेन आणि माझ्यावर गुन्हे सिध्द झाले तर कोर्ट जी शिक्षा देईल ती मला मान्य करावीच लागेल. मात्र मी गुन्हेगार नसताना कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर मला त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असा इशारा दिला.
किरीट सोमय्या यांच्याकडून माझी बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. खोटी कागदपत्रं दाखवून सगळे भ्रष्ट असल्याचा भ्रम तयार केला जात आहे, असं अनिल परब यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, ज्यांच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहे. त्यांनी इतरांवर आऱोप करणेच हास्यास्पद आहे. कारण चौकशा दोन्ही बाजूने सुरू आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्या. चौकशीअंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल.
काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
अनिल परब यांच्यावर मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्यानंतर किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी सोमय्या म्हणाले होते की, अनिल देशमुख, नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे आता अनिल परब यांनी बॅग भरुन तयार रहावे, असा इशारा सोमय्या यांनी दिला होता.
अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे pic.twitter.com/bIMek2Etew
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2022