महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर ED ने चौकशीचा फास आवळायला सुरवात केली आहे का? राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर ईडी ED चौकशी चं जाळ टाकलं आहे, तर शिवसेनेचे परिवहन मंत्री हे ही इडीच्या रडारवर आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भाजप मार्फत ईडीने जाळ टाकलं आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
गेल्या दोन दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी साठी ठराव केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट त्याच रात्री ईडी ची पवारांविरुद्ध कार्यवाही झाली.
महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही मेसेज केंद्राला द्यायचाय का? की महाविकास आघाडी सरकारला काही इशारा द्यायचा आहे. असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शिवसेना भाजप युती तुटल्यावर भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी उरकला. मात्र, दीड दिवसातच अजित पवार यांच्यामुळे सरकार कोसळले, ही भाजप नेत्यांमधील सल अजूनही जात नाही. सुरवातीला अजित पवार यांच्याबाबत मवाळ असलेल्या भाजप ने आता अजित पवार यांच्या विरुद्धच मोर्चा उघडलाय.
शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादीचे नंबर दोन चे नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोवती सक्तवसूली अंमलबजावणी संचालनालय (ED) ने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांचा 65 कोटींचा सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना ईडी कडून जप्त झाला आणि या व्यवहारात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्यांचा थेट संबंध असल्याचं ईडी कडून सांगण्यात आलं असल्याचं बोललं जातंय. ईडी च्या कार्यवाही नंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय माझ्या नातेवाईकांचा कारखाना आहे, नियमाने विकत घेतला आहे आणि इतरांपेक्षा जास्त किंमतीने घेतला आहे. ईडीला चौकशी करण्याची तर करा, पण राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विकत घेतलेल्या कारखान्यांची चौकशी करा असं सूचित केलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ईडीने आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या कारखाना शी थेट संबंध जोडला जातोय.
महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉडरिंग विरोधी कायद्यान्वये ईडी ने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. 2010 मध्ये जरंडेश्वर कारखाना खरेदी करण्यात आला. त्यावेळेस त्याचे मूल्य 65 कोटी 75 लाख इतके होते. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्यांची जागा इमारत, कारखाना, व जप्त करण्यात आली.
राज्य सहकारी बँक बँकेतील घोटाळ्या प्रकरणी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हाही दाखल केला होता. नंतर 2019 जरंडेश्वर कारखाना विरुद्ध पीएमएलए चा गुन्हा दाखल झाला आहे. तसंच तेव्हाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांच्या संचालकांनी कमी किंमतीत आपल्याच नातेवाईकांना विकला.
अजित पवारांचा संबंध आहे का ?
जरंडेश्वर साखर कारखाना विरुद्ध केलेल्या कारवाही नंतर ईडीने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 2010 मध्ये नियमांचे पालन न करता विकून टाकला, लिलावात कारखान्यांची किंमत कमी दाखवली, तत्कालीन सहकारी बँकेच्या संचालक मंडळात अजित पवार हेही होते. हा कारखाना गुरू गणेश कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ने विकत घेऊन, लगेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.लिजवर दिला, विशेष म्हणजे स्पार्कलिंक सॉईल प्रा.लि. कंपनीकडे जरंडेश्वर कारखानाचे सर्वाधिक शेअर्स आहेत. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कंपनीशी संबंधीत असल्याचा दावा ईडीने केला आहे. कारखान्याच्या नावाने बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज ही उचलले आहे असं ही ईडीने दावा केला आहे.
राज्य शिखर सहकारी बँकेच्या घोटाळ्याची पुन्हा चर्चा
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. बँकेच्या संचालक मंडळात सर्वाधिक राष्ट्रवादीचेच बडे नेते होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चौकशीचे आदेश दिले होते. ह्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीमध्ये वाद झाले होते. बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा भाजपने हाच मुद्दा पकडून 2014 मध्ये सत्तेत आली होती. मात्र, राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशी नंतर 65 जणांना क्लीन चिट देण्यात आली होती.
मागील वर्षी मुंबई उच्च नायालयात क्लोजर रिपोर्ट ही सादर करण्यात आला होता. मात्र, त्याविरुद्ध जरंडेश्वर कारखान्याच्या संचालिका व माजी मंत्री शालिनीताई पाटील प्रोटेस्ट याचिका दाखल केली आहे. हीच याचिका राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची पुन्हा फाईल ओपन होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
सर्वच राजकीय नेत्यांच्या कारखान्यांची चौकशी करा- अजित पवार -
ईडी च्या कार्यवाही नंतर अजित पवार यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. माझ्या नातेवाईकांचा कारखाना आहे, नियमाने विकत घेतला आहे आणि इतरांपेक्षा जास्त किंमतीने घेतला आहे. ईडीला चौकशी करण्याची तर करा, पण राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विकत घेतलेल्या कारखान्यांची चौकशी करा असं सूचित केलं आहे.
ह्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहकारी कारखाना डबघाईस आणून स्वतःच किंवा जवळच्या लोकांना खाजगीत घेतला, यामुळे अनेकांची पंचाईत होणार आहे. कारण अश्या कारखान्यांची कोणी ना कोणी तक्रार केली आहे. त्यांची ही चौकशी करा असं अजित पवार यांना सूचित करायचं आहे.
शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया
जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हटलं की 'देवाच्या काठीला आवाज नसतो' असं सांगत अजित पवारांवर टीका केलीय. 27 हजार कारखान्याच्या सभासद यांना न्याय मिळाला, ईडीने आमच्या तक्रारीची दखल घेतली ईडी च्या कार्यवाही चे स्वागत करत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.
केंद्राने ED सीबीआय आता रणगाडे पाठवले तरी काही होणार नाही- संजय राऊत
महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्यासाठी केंद्राने आपल्या एजन्सीज लावल्या आहेत. ईडी सीबीआय आता रणगाडे पाठवले तरी काही होणार नाही. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमप्रतिनिधींना केंद्रांवर टीका केली