महाराष्ट्राला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळणार, अतुल लोंढे यांचं वक्तव्य

Update: 2023-08-26 12:11 GMT

आधी सुप्रिया सुळे आणि त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचे वक्तव्य केलं. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यावर बोलताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की, महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, “शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नाही, ‘इंडिया’ आघाडी बरोबरच राहणार आहेत”, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेले त्यांचे सहकारी शरद पवार यांच्या पाया पडतात. याचा अर्थ असा आहे की, भाजपाने जी राजकीय घाण केली आहे त्याचे उत्तर अजित पवार रिटर्न्सने मिळू शकते.

भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत विरोधी पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. भाजपाने आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले व कटकारस्थान करून एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही तेच केले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्षम व राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. अजित पवार यांच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. शरद पवार यांचे राजकारण पाहता भारतीय जनता पक्षाला ते कात्रजचा घाट दाखवतील, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Tags:    

Similar News