Ajit pawar : पंतप्रधान कार्यालयाने अजित पवार यांचे भाषण डावलले, टीकेनंतर भाजपचे स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषण डावलल्याने राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात असतानाच भाजपने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषण करू दिले. मात्र अजित पवार यांचे भाषण डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपने अजित पवार यांचे भाषण डावलण्यात आल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही, असे भाजपने म्हटले आहे. तसेच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला.
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यातील एकच कार्यक्रम सरकारी होता, तो राजभवन येथील. तेथे प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. (येथे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही, हे लक्षात घ्या) असेही भाजपने म्हटले आहे.
मुंबई समाचारचा कार्यक्रम खाजगी होता. तरीही तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाही. याबरोबरच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा केला नाही. कारण भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही.
ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे, त्यांना महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे. त्यामुळे त्यांना औषध नाही, असा टोला भाजपने लगावला आहे.