तुमची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांनी राज ठाकरे यांना फटकारले
राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या अल्टीमेटमवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना चांगलेच फटकारले आहे.;
राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज्यात राजकारण तापले आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमवर प्रतिक्रीया देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांना फटकारले आहे.
अजित पवार यावेळी म्हणाले की, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे ध्वनिप्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण त्याचा फटका मशिदींवरील मुस्लिम नागरिकांसोबतच हिंदू नागरिकांनाही बसणार आहे. कारण ग्रामिण भागात अखंड हरिनाम सप्ताहात रात्री उशीरापर्यंत कीर्तन चालतात, भजन चालतात, काकड आरत्या चालतात. त्यामुळे या भुमिकेचा हिंदू धर्मीयांनाही फटका बसणार आहे.
तसेच कोणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत असेल किंवा अल्टीमेटम देत असेल तर त्यांनी त्याचा अल्टीमेटम आपल्या घरात ठेवावा. कोणाचीही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. कारण हा विषय राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवलंब करण्यासाठीचे सर्व कठोर निर्णय घेतले जातील. त्यामध्ये कोणत्याही धर्मीय नागरिकांनी न्यायालयाने दिलेल्या नियमांचा भंग केला तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
भोंग्यांचा निर्णय फक्त एका धर्माच्या प्रार्थना स्थळाला लागू होत नाही. तर तो सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना लागू होतो. त्यामुळे या निर्णयाबद्दल आतापर्यंत समोपचाराची भुमिका सर्वच धर्मीयांनी महाराष्ट्रात घेतली होती. त्यामुळे हा मुद्दा 2005 च्या निकालानंतरही आतापर्यंत तसाच राहीला होता, असे मतही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले.