सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवार आमचे दैवत असल्याचे म्हटले जात होते. मात्र अजित पवार गटाने शरद पवार यांना टाळल्याचे समोर आलं आहे.
अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार आमचे दैवत असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. पण शरद पवार यांनी माझा फोटो वापरू नका, असं अजित पवार गटाला बजावलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाने नाशिकमधील कार्यक्रमावेळी शरद पवार यांचा फोटो टाळून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दिल्लीतील 79 नॉर्थ एव्हेन्यू या सरकारी बंगल्यात नवं पक्ष कार्यालय सुरू केलं आहे. त्याचे होम हवन करत प्रफुल्ल पटेल यांनी उद्घाटन केले. मात्र या कार्यालयात राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला नाही. तर या नव्या पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. या नव्या पक्ष कार्यालयात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल बसणार आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यालय 1 कनिंग लेन येथे होते. ते आता सुप्रिया सुळे यांच्या 81 लोधी इस्टेट या सरकारी बंगल्यात असणार आहे.