अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सांगितला सत्तास्थापनेचा मार्ग
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे आपल्या भुमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर राज्यात मनसेच्या सैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला. त्यावरून अजित पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.;
राज ठाकरे यांच्या भुमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्याने राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे की, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ते येत असते जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. उध्दव ठाकरे तुम्हीही नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. त्यावरून अजित पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, आम्हीही नेहमी हेच सांगत असतो की, सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आले नाही. आत्ता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या आधी देवेंद्र फडणवीस होते, पृथ्वीराज चव्हाण होते, अशोक चव्हाण होते, विलासराव देशमुख होते, सुशीलकुमार शिंदे होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सत्ता नेहमी बदलत असते. ज्यांच्या पाठीशी 145 आमदार उभे असतील तो व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सांगत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सत्तास्थापनेचा मार्ग सांगितला.
अजित पवार म्हणाले की, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाही हे खरं आहे. पण कोणीही अल्टीमेटम देणंही योग्य नाही. कारण अल्टीमेटम देण्यासाठी हे काय हुकुमशाही राज्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला.