अंतरवाली सराटी येथे ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना सूचना दिल्या असून देखील मराठा आरक्षणाची धग अजून कायम आहे. याचीच प्रचिती नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांना निवडणूकीच्या प्रचारासाठी गावात येण्यासाठी मज्जाव केला आहे.
नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचे अनुषंगाने कोंढा गावात अशोकराव चव्हाण हे मतदारांच्या भेटीगाठी आले असता तेथील स्थानिक मराठा समाजबांधवांकडून आक्रमकपणे एक-मराठा, लाख-मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत चव्हांणांविरोधात रोष व्यक्त केला.
कोंढा गावात प्रतापराव चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांचं आगमन होताच गावकऱ्यांचा मोठा जमाव तयार झाला आणि शेकडो संख्येने जमलेल्या या जमावाचा उद्रेक पाहून आशोक चव्हाण यांनी तिथुन काढता पाय घेतला. येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यात विविध पक्षांच्या नेत्यांना सुध्दा गावबंदीचा फटका बसण्याची फटका बसण्याची शक्यता असून प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे, अशी चिन्हे दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणामध्ये सगेसोयरे अंमलबजावणीसाठी आजही तितकेच आग्रही आहेत. सध्या कोणत्याही गावात नेत्यांना गावबंदी नाही, मात्र काही ठिकाणी मराठा बांधवांचा रोष हा पहायला मिळतोय. यापूर्वी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध नेत्यांना गावात प्रवेशबंदी करून गावात येण्यास मज्जाव केलेला आहे. आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना देखील कोंढा गावात निवडणूकीच्या प्रचारासाठी आल्यावर मराठा बांधवांकडून कडाडून विरोध करत संताप व्यक्त केला आहे.