राजेंच्या मदतीला राजे, संभाजी राजेंच्या माघारीनंतर शिवेंद्रराजे भडकले
सातारा आणि कोल्हापुर या दोन्ही राजघराण्यात कायम संघर्ष पहायला मिळतो. मात्र संभाजी राजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजेंच्या मदतीला राजे धावून आल्याचे दिसून आले.;
संभाजी राजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. दरम्यान सातारा आणि कोल्हापुर या दोन्ही राजघराण्यातील संघर्ष विसरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संभाजी राजे यांचा ठरवून गेम करण्यात आल्याची टीका केली.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संभाजी राजे यांच्याबाबतीत काय घडलं? कोणी घडवलं? हे सर्व संभाजी राजे यांना माहीत आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा सर्वांनी मिळून गेम केल्याची टीका शिवेंद्रराजे यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता शिवसेनेवर हल्ला चढवला.
यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजाने संभाजी राजे छत्रपतींच्या पाठीशी उभे रहावे. तसेच संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे. कारण संभाजी छत्रपती हे आमच्या छत्रपती कुटूंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष केला आहे. समाजाला एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे आता खासदारकी गेली असेल तरी संभाजी राजे यांनी विचारपुर्वक निर्णय घ्यावेत, असा सल्ला शिवेंद्रराजे यांनी दिला.
पुढे बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, संभाजी राजे यांनी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात समाजाचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यामुळे मराठा समाजातील संघटनांनी संभाजी राजे यांच्या पाठीशी रहावे आणि संभाजी राजे यांनी राज्याचे नेतृत्व करावे, असं मत मांडले.
संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याची केली होती घोषणा
संभाजी राजे यांनी 12 मे रोजी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती. तसेच सर्व पक्षांनी माझ्या उमेदवारीला पाठींबा द्यावा, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली होती. मात्र शिवसेनेने शिवबंधन बांधल्याशिवाय संभाजी राजेंना पाठींबा नाही, अशी भुमिका घेतली आहे. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्ते संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर संभाजी राजे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.