छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून त्यात वाघनखं ठेवा- आदित्य ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनवरून आणण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असल्याचे समोर आले आहे. त्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याची मागणी केली.;
राज्य सरकारने तीन वर्षांच्या कर्जाने का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लडमध्ये असलेली वाघनखं पुन्हा परत आणण्याची घोषणा केली आहे. त्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले, ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का? त्याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं आहे का? जर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं नसतील तर सरकारने लोकांच्या भावनेचा खेळ करू नये, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, जर ती वाघनखं सरकार आणणार म्हणजे भाड्याने आणणार की परतच आणणार. जर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणणार असतील तर आम्ही सगळेच जण त्याचं स्वागत करू. याबरोबरच ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधून त्यात ठेवावीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.