पुढील महिन्यात होऊ घातलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. यानंतर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रीया निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर पाहायला मिळत आहेत. आम आदमी पक्षाने देखील आत या प्रकरणावर भाजपने लोकशाही गाडली अशी प्रतिक्रीया दिली आहे.
आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी प्रिती शर्मा मेनन यांनी निवडणुक आयोगाला खडे बोल सुनावत टीका केला आहे आणि देश अंधारलेल्या दरीत जात चालला आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. "निवडणुक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गोठवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो फार धोकादायक निर्णय आहे. भाजप दुसऱ्या पक्षातील आमदारांना घाबरवून, धमक्या देऊन, पैशांच आमिश दाखवून विकत घेतं हे तर आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत. पण भाजप निवडणुक आयोगाचा वापर करून दुसऱ्या पक्षांचं अस्तित्वच संपवू पाहतंय यामुळे लोकशाही गाडली जातेय. या देशातील लोकशाही संपली आहे. हे एका आपात्कालाचे संकेत आहेत. आज या देशात आपात्काल आहे. एकाधिकारशाही च्या दिशेने भाजप या देशाला नेऊ पाहतो आहे. ते आपल्याकडून आपलं स्वातंत्र्य जे आपण लढून झगडून मिळवलं होतं ते हिरावू पाहताहेत. यासाठी आपल्या सगळ्यांना जागृक होणं गरजेचं आहे." अशी टीका आप च्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी केली आहे.