ठाण्यात ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खालच्या स्तरावरचे वक्तव्य करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्या विरोधात ठाणेच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील सत्ता हातातून निसटून गेल्यावर ठाण्यात ठाकरे गटाकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नको त्या भाषेत टीका केली जात आहे. अत्यंत खालच्या थराला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी वक्तव्य करत आहेत. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी देखील अशीच बरळ काही दिवसांपूर्वी ओकली होती. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली होती, त्यामुळे वागळे इस्टेट पोलीस स्टेशन ( Wagle Estate Police Station) मध्ये संजय घाडीगावकर (Sanjay Ghadigonkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे समन्वयक एकनाथ भोईर, आयटी विभाग प्रमुख शैलेश कदम आणि माजी परिवहन सदस्य दशरथ यादव यांनी गुरूवारी रात्री उशिरा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ठाकरे गटाकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका करून बदनाम केले जात असून शिंदे यांच्याबद्धल आक्षपार्ह विधान करण्याची जणू स्पर्धा विरोधकांनी सुरू केली आहे.
मात्र विरोधकांच्या या टीकेने महाराष्ट्रतील तमाम शिवसैनिकांच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटातून केला जात आहे. त्यामूळे समाजात तेढ निर्माण करणे आणि आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.