आमदार अपात्रता प्रकरणी ३ ऑक्टोबरलाही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही
आमदार अपात्रता प्रकरणी ३ ऑक्टोबरलाही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही, जाणून घ्या पुढची तारीख;
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते. तर ३ ऑक्टोबर रोजी सुनावणीचे वेळापत्रक देण्याची मागणी केली होती. मात्र ३ ऑक्टोबर ची सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे.
सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी विलंब केल्याची याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी खडे बोल सुनावत सुनावणी चे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही युक्तिवाद केला. त्यानंतर पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी घेणार असल्याचे म्हंटले. तर त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी चे वेळापत्रक जारी केले आहे.
सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक मान्य करणार की नाही? याविषयी चर्चा सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी दिलेले वेळापत्रक सुप्रीम कोर्ट मान्य करणार की नाही हे ६ ऑक्टोबर रोजीच समजणार आहे.