सॉक्रेटिस ते सर रामानुज

Update: 2017-10-13 07:48 GMT

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन विमानतळावर थांबलो होतो तेव्हा हातात थोडा वेळ होता म्हणून फिरत फिरत एका बुकस्टॉलवर गेलो. समोरच्या न्यू अरायव्हल स्टँडवर जगप्रसिद्ध लेखक रे कॉनलेचे Being a Lonely Life हे पुस्तक होते. आधाशीपणाने थोडे चाळले. ‘एकाकी जीवन जगताना’ हे शीर्षकही आकर्षक वाटेल असेच होते. तो जगप्रसिद्ध पत्रकार, पटकथालेखक आहे. तरुण वयात त्याने मजूर म्हणूनही काम केले. त्याला अभिनेता व्हावेसे वाटायचे. बऱ्याच वर्षांनंतर तो गायक बनला. अचानक वयाच्या ६० व्या वर्षात त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. तो जेव्हा ७० च्या आसपास पोहोचला तेव्हा त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. तरीपण तो जीवनातले एकाकीपण अनुभवतो याचा अर्थ तो अविवाहित असेल, असे तुम्हाला वाटेल. पण तो तीन नातवंडांचा आजोबा असूनही एकाकी आहे. या समृद्ध, आगळ्या अनुभवविश्वातूनच एकाकीपणावरचे भन्नाट पुस्तक वैचारिक वादळ उठवत आहे. स्त्रिया, पुरूष हे विवाहित असोत वा नसोत एकाकीपण ही आजच्या समाजाची मानसिकता आहे. हे सत्य जगभर स्वीकारले गेले आहे.

ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेतून जाताना विमानात देवदास हा खूप जुना चित्रपट पाहताना मला खूप आनंद झाला. प्रवासाचा ताण जाणवलाच नाही. मुंबईला सिडनीहून परतताना योगायोगाने The Man Who Saw Infinity (त्या माणसाने अनंतता पाहिली) हा सर रामानुज या शास्त्रज्ञाच्या जीवनावरचा इंग्रजी चित्रपट पाहिला. दोन्हीही चित्रपट अप्रतिम होते. या भारतीय थोर शास्त्रज्ञाचा अकाली मृत्यू झाला. त्याला कारण म्हणजे हिंदू धर्मातील कर्मठ, सनातनी, ब्राह्मणी संस्कार. सातासमुद्रापलीकडे जाणे हेच पाप मानणारी आमची धर्मरूढी. त्या थंड तापमानात बटाटे उकडून खाणाऱ्या या शास्त्रज्ञाचे जेवणाखाण्याचे हाल. क्षयाची बाधा झाली. पण आईने केलेली आज्ञा. अंडी, मटण खाण्यावर बंदी. तरुण पत्नीला लिहिलेली पत्रेही आईने सुनेला दिली नाहीत. तिला वाटले आपण इतकी पत्रे लिहिली त्याला एकही उत्तर नाही. ती नैराश्याने माहेरी निघून जाते. एका थोर शास्त्रज्ञाला एकाकी जीवन जगायला लावणारी ही आमची संस्कृती. अभिमान बाळगण्यासारखे काय आहे यात? भारत देशाच्या वैज्ञानिक जगतातले किती मोठे नुकसान सर रामानुज अकाली गेल्याने झाले! याला शब्द नाहीत.

काही वर्षांपूर्वी ग्रीसला गेलो. अथेन्सला भरलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत शोधनिबंध सादर केला. आणि नंतर, सॉक्रेटिसला बंदी बनवण्यात आल्यावर जिथे डांबले होते... डॅमलॉक नावाचे विष पिण्यास देऊन जीवन संपवण्याची शिक्षा त्याला जिथे देण्यात आली होती, तो तुरुंग पाहिला. ज्या चर्चच्या ओट्याजवळ तो चर्चा करीत बसे ती जागा पाहिली. मरेपर्यंतचा सत्याचा आग्रह न सोडणाऱ्या या तत्त्वचिंतकाचे एकाकी जीवन आठवले. संसारी असूनही तो आपल्या जीवनकार्यात समाजचिंतनात पूर्ण रमून गेला. एके काळचा समरांगणातला योद्धा सदाचार, नीतीचा संदेश देऊन अजरामर होतो, प्लुटो,अॅरिस्टॉटलसारखी परंपरा मागे ठेवून जातो.

एकाकीपण जीवनात कधीही अनुभवलं नाही असा माणूस विरळा. अशा विचारात असताना थोर तटस्थतेने शांतपणे आत्मपरीक्षण करा. मग लक्षात येईल की, आपण एकाकी कधीच नसतो. आपल्याबरोबर भूतकाळ असतो. वर्तमान असतो. अजून पुढे येणारा भविष्यकाळ असतो. स्मृतीच्या खजिन्यात तर अनेक घटना असतात. अलीकडचे वैज्ञानिक संशोधन सांगते की, आता एकाकीपण हे ज्यांना संकट वाटते त्यांना त्यावर मात करायचा सोपा उपाय सापडला आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर मानसिकतेत बदल करा म्हणजे प्रश्न सुटलाच म्हणून समजा. एकाकीपणाची समस्या भारतीयांपेक्षा पाश्चात्य देशांत तीव्रतेने जाणवते. म्हणून युनव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया, हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल यांच्या अभ्यासकांनी साधारण एक हजार विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. कॉलेजला आल्यापासून तुम्ही किती मित्र केलेत? किती ग्रुप केलेत? या अभ्यासात असे आढळले की जी मुले विविध गटांत सामिल झाली त्यांना जिवाभावाचे मित्र लाभले. आपल्याला कोणी मित्र नाही अशा नकारात्मक विचारसरणीच्या मुलांना मात्र एकाकीपण सतावते. दिवसभर कार्यालयात वा समारंभात गर्दीत वावरणारा देखील घरी एकाकीपण अनुभवत असेल. पण अशा एकाकीपणातून शारीरिक व मानसिक व्यथा जीवनात मार्गी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही गोष्ट केवळ मानवातच होते असे नाही. तर मानवेतर पशु, पक्षी, जलचर प्राण्यांच्या बाबतही आढळते. आश्चर्यचकित करणारे निष्कर्ष अलीकडे वैज्ञानिकांनी काढले आहेत.

मासे, मगरी हे आपल्या जातीच्या समूहाला अन्न कोठे आहे, धोका कोठे आहे याबाबत संकेत देतात. जणू त्यांचा हा संवादच. संपर्क. मधमाशा या समूहाने राहतात. पोपटांच्या बाबतीत असे आढळले की जे एकटे राहतात ते लवकर मरतात. विशेषत: लोकांनी मौजेसाठी पिंजऱ्यात कोंडलले पोपट लवकर मरतात. डॉ. अकिलो कोटे आणि सहकाऱ्यांनी जर्नल बिहेविअरल इकॉलॉजी अँड सोशिओलॉजी यात असा निष्कर्ष काढला की ज्या मुंग्यांना स्वतंत्र राहावे लागते त्यांच्या जीवनातील संतुलन बिघडते व त्या लवकर मरतात. (social isolation causes mortality by disrupting energy homeostasis in ants.) त्या मानाने समूहात राहणाऱ्या मुंग्या अधिक जगतात. हीच गोष्ट माणसाबाबत आहे. मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशा वृत्तीने सामाजिक उत्क्रांती होत नाही. सर्वे सुखिन: संतु सर्वे संतु निरामया: ही खरी भारतीय संस्कृती आहे. सारे समाज, सारी निसर्गाची लेकरे! सारे एकत्र खाऊ, खेळू… जगू. या भूमिकेने समाजात स्वास्थ्य, आरोग्य नांदू शकते.

“Building pathways of compassion and co - existance is a need of time.”

डॉ. सुभाष देसाई

 

Similar News