शिवसेना आणि भाजपा यांच्यात पेटलेल्या सत्तासंघर्षाची झळ आता थेट उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी प्रथमच जाहीर आरोप केला आहे. हे आरोप जरी आता करण्यात आले असले तरी ही माहिती नवी नाही. याच माहितीच्या आधारावर आतापर्यंत शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत राहिला आहे.
भाजपाचे खासदार आणि विविध आर्थिक गैरव्यवहार सातत्याने उघड करणारे किरीट सोमय्या यांनी नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक आपल्या लेटरहेडवरून जारी केले आहे. या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या संपत्तीच्या बाबतीत कधीही, कोणतीही चौकशी करा. मात्र, त्याचसोबत पारदर्शकतेचा आव आणणा-या उद्धव ठाकरे यांच्याही संपत्तीची चौकशी करा, असा सूर आळवला आहे. उद्धव ठाकरे यांचे जगमांद्री फिनवेस्ट प्रा. लि., किम इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज लि, जेपीके ट्रेडींग प्रा. लि, या बोगस अथवा खोका कंपन्यांशी ठाकरे यांचे काय संबंध आहेत हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले आहे. तर लेक्सस इन्फोटेक लि, यश व्ही ज्वेलस लि, या दोन कंपन्यांना सेबीने याआधीच मनाई हकूम बजावून कारवाई सुरू केली आहे. तर रिगल गोल्ड ट्रेडींग कं. प्रा. लि. आणि वॅनगार्ड ज्वेलस लि. या दोन कंपन्यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनीही मनीलॉड्रींग केले असून या कंपन्यांशी उद्धव ठाकरे यांनी आपले काही संबंध आहेत का, हे स्पष्ट करावे. या सहा बेनामी अथवा खोका कंपन्यांमध्ये ठाकरे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप करीत सोमय़्या यांनी महापालिका निवडणूका प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे तत्कालिन अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याही पूर्ती कारखाना आणि काही अशाच शेल कंपन्यांमधील गुंतवणूकीबाबतची माहिती उघड झाली होती. त्यावेळी गडकरी यांची पक्षातील ताकद आणि प्रभाव पाहता त्यांना नामोहरम करण्यासाठी ती खेळी कुणी केली होती आणि त्यामागे कोण होते हे वेगळे सांगायला नको. एकुणच अडचणीच्या ठरणा-या अथवा पक्ष आणि स्ववाढीच्या आड येणा-यांना कोणता धाक दाखवायचा आणि त्यांना गप्प करायचे याची गुरूकिल्लीच काही मंडळींना सापडली आहे. ठाकरे यांच्याबाबतची फाईल तयार आहे अशी आवई अधून मधून उठवली जायची. त्याचा कमी अधिक फायदा कदाचित राज्यातील सत्ता टिकवण्यात झाला असावा, मात्र, आमच्या आणि सत्तेच्या आडवे याल तर आडवे करू, असा इशाराच भाजपाने यानिमित्ताने दिला आहे. आता थेट शेल कंपन्यांची नावे उघड करीत सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले आहे. मुंबईवर पुन्हा झेंडा फडकावू पाहणा-या ठाकरेंना ईडीच्या बागुलबुवाचे चित्र उभे करून लगाम घालता येतो का याची चाचपणी भाजपच्या वॉररूमधून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होवू लागलीय.