अभिनय - मनोरंजन क्षेत्रात व्यवसायाने डॉक्टर पण अभिनयात रमलेल्या काही दिग्गजांपैकी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अलीकडे बोलबाला आहे. डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. गिरीश ओक असे बरेच प्रस्थापित डॉक्टर्स अभिनयात इतके काही रमलेत की त्यांच्या मूळ वैद्यकीय व्यवसायाची ओळख कालांतराने पुसट झाली. ह्याच डॉक्टरी व्यवसायातील अलिकडचा लोकप्रिय अभिनेता म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांची समांतर ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिकाधिक भूमिका त्यांनी साकार केल्या आहेत. महाराष्ट्राचे लाडके भूषण असलेल्या छत्रपती यांच्या पैलू, व्यक्तिमत्व, गुणांशी साधर्म्य साधणारा आणि तितकेच ह्या भव्य-दिव्य लोक नेत्याशी मनःपूर्वक प्रेम करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शंभू राजे अर्थात संभाजी महाराज देखील नाटकात आणि छोट्या पडद्यावर मूर्तिमंत साकारले आहेत…
शिवाजी महाराज यांच्या देदिप्यमान कारकिर्दीबद्दल उभा महाराष्ट्र जाणतोच. पण त्यांचे चिरंजीव आणि राजकीय वारसदार संभाजी राजेंबद्दल जनमाणसात अनेक भले -वाईट वाद-प्रवाद आहेत ! पिता की पुत्र, कुणाची कारकीर्द - भीम पराक्रम थोर हा एक संशोधनाचा विषय ठरावा! पण शंभू राजांची उत्तुंग कारकीर्द, पराक्रमाच्या गाथा तशा झाकोळलेल्या राहिल्यात! कदाचित त्यांच्या जीवनाची -पराक्रमाची गाथा दर्शकांच्या नव्याने सामोरी यावी म्हणून लोकप्रिय वाहिनी ‘झी ‘ मराठीवर २४ सप्टेंबरला ‘स्वराज्यरक्षक संभाजी ' ह्या ऐतिहासिक आणि भव्य -दिव्य मालिकेचा शुभारंभ झाला आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सदर मालिकेचे प्रक्षेपण सुरु होईल. छत्रपतींचा पोशाख आणि प्रतिमा यातून डॉ. अमोल कोल्हे बाहेर पडणार का ? अर्थातच , शंभू राजांची भूमिका या आधी देखील साकारलेल्या आणि आपल्या इतिहासावर - शिवाजी -संभाजी ह्या लाडक्या नेत्यांवर जीवापाड प्रेम करणारा अमोल कोल्हेसारखा अभिनेता विरळाच... अमोल कोल्हे यांच्याशी बोलतांना जाणवले , ह्या अभिनेत्यात ही दोन्ही थोर व्यक्तिमत्व आरपार सामावलेली आहेत. कितपत सुसंगत आहेत सध्याच्या काळात संभाजी राजांची मालिका - हा विषय, त्यांचा लार्जर दॅन लाईफ जीवनपट ?
अमोल कोल्हे म्हणाले, का नाहीये सुसंगत ? प्रश्न फक्त मराठी माणसाच्या अस्मितेचा नाहीये ! एकूणच प्रांतीय वाद -राजकारण - कलह - तेढ विकोपाला गेलेत.. आपले नेते म्हणवणारी राजकीय मंडळी खुर्च्या सांभाळत आहेत. सर्वसामान्य जनतेचा खरा कैवारी कोण, इतके गोंधळाचे - अस्थिरतेचे वातावरण आहे. आपली अस्मिता जपत ताठ मानेने जगवणारा नेता म्हणजे शंभू राजे, त्यांचे विचार - धोरण आजही समर्पक आहे. म्हणून त्यांची कारकीर्द -जीवनपट सुसंगत आहे. ''लेखक प्रताप गंगावणे यांनी अथक परिश्रम घेऊन 'स्वराज्य रक्षक संभाजी' चे लिखाण केलंय . इतिहासातील पानांवर शंभू राजांना तितकासा न्याय मिळाला नाही , उलट वाद आणि प्रवाद यांच्या सीमेवर राहिलेत ते ! त्यांची ही इमेज पुसण्याचा प्रयत्न लेखक गंगावणे यांनी केलाय का ? इतिहास आणि कल्पना शक्ती यात कशाचं पारडे जड आहे असं तुम्हांला वाटतेय ?'
अमोल कोल्हे - ‘ संभाजी महाराज यांची कारकीर्द -त्यांचा भीम पराक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहावा असं असताना नियतीचे दान त्यांच्या बाजूने कधी पडले नाही. कर्तृत्व आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या शंभू राजांवर तसा इतिहासानेही अन्याय केला. स्वकियांकडून होणारे वार, मोगलांचे सततचे हल्ले तरीही सगळ्या आघाड्यांवर पुरून उरलेला हा राजा , पण त्यांच्या सकारात्मक बाजू उजेडात आल्या नाहीत , त्यामुळे सत्याची कास धरत , आणि अनेक प्रदीर्घ संशोधन करत लेखक प्रताप गंगावणे यांनी ' स्वराज्य रक्षक संभाजी 'चे शिव धनुष्य पेलले आहे . '
'मनोरंजन आणि इतिहास यांचा समन्वय साधताना तुम्हांला काय वाटले ? विशेषता तुम्ही जेंव्हा अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकार केली असतांना संभाजी साकार करणे कितपत अवघड भासले ?'
अमोल कोल्हे - 'माझ्यासाठी शिवाजी महाराज आणि अजेय संभाजी महाराज दोन्ही माझे दोन डोळे आहेत . डावा डोळा की उजवा डोळा मला प्रिय आहे , हे जसे सांगता यायचे नाही , तसे माझे आहे . शिवाजी आणि संभाजी ह्या दोन्ही व्यक्तिरेखा मला अतिशय प्रिय आहेत . छत्रपतींचा अतुलनीय पराक्रम सर्वश्रुत आहेच , पण हे फारच थोड्याना ठाऊक असेल ,की संभाजी राजांनी १६८ युद्धं केलीत आणि ती सर्व युद्धं जिंकलीत ! शंभू राजांना एकूण १६ भाषा अवगत होत्या , त्यांनी ४ ग्रंथांची निर्मिती केली .. शंभूराजांनी आरमारासाठी ५ जहाज बांधणीचे कारखाने बांधलेत , सातत्याने डोकं वर काढणाऱ्या शत्रूंना नामोहरम केलं , छत्रपतीचे दक्षिणेचे स्वप्नही पूर्ण केलं ! शंभू राजांच्या अशा अनेक पराक्रम गाथा असताना त्यांना दुर्देवाने समुचित स्थान नाही मिळाले . पण म्हणून त्यांचा पराक्रम कमी होत नाही .. शंभू राजे सदैव अजेय राहतील . मी स्वतः शंभू राजांची गाथा रसिकांसमोर मांडण्याचे स्वप्न उराशी बाळगून होतो , तब्बल ८ वर्षे ! ध्यानीमनी ध्यास घेतलेले हे स्वप्न जेंव्हा झी मराठी वाहिनेने पूर्ण केले , कारण फक्त मनोरंजन हा हेतू न बाळगता सामाजिक जवाबदारीचे भान त्यांनी कायम मानले...
'स्वराज्य रक्षक संभाजी ' निर्मितिची मोलाची मदत निर्माता म्हणून अमराठी असूनही पिंकू बिस्वास यांनी हे स्वप्न साकारण्यास मदत केली , दिग्दर्शक कार्तिक केंढे आहेत. जिजाऊंच्या भूमिकेत जेष्टय अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर आहेत, तर साहस दृश्य रवी दिवाण आणि छायाचित्रणाची किमया साधली आहे निर्मल जानी यांनी .
पूजा सामंत