दुर्गासप्तशती हिंदू धर्माचा सर्वात लोकप्रिय ग्रंथ आहे. यामध्ये जगदंबेच्या उपासनेचा आणि कृपाप्रसादाचा इतिहास आहे. जाणकरांच्या मते त्यात गूढ साधन रहस्य भरलेले आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञानाच्या त्रिविध रूपातील या मार्गाने जाणाऱ्या भक्तांसाठी कल्पवृक्ष आहे. सगुण- साकार असे ईश्वराचे स्वरूप पुजणाऱ्या भक्तांना हवी असणारी समाधी अवस्था या मार्गाने सहज लाभते. आणि जे निष्काम भावनेने आई अंबेची उपासना करतात त्यांना हिंदू धर्मातील सर्वोच्च साध्य गोष्ट म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे कोठे पळून जाणे नव्हे. बंधनातून मुक्तता म्हणजे मोक्ष. अज्ञानाच्या गाठी सुटत गेल्या म्हणजे आपोआपच तुम्ही ज्ञानी बनता. बुद्ध बनता.
भारतीय धर्मग्रंथानुसार श्री दुर्गाउपासनेमुळे राजा सुरथला अखंड साम्राज्य प्राप्त झाले. आणि वैराग्यसंपन्न वैशला समाधी प्राप्त झाली आणि दुर्लभ ज्ञानामुळे मोक्षही प्राप्त झाला. गाथा सप्तशती हा मंत्रमय ग्रंथ आहे. त्याचे ऋषी नारायण, छंद, अनुष्टुप आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती उपदेवता आहेत.
प्रारंभी शिव-पार्वती संवाद आहे. शिवजी कलीयुगात सर्व कामना सिद्ध करण्याचे साधन सांगण्याची विनंती करतात. त्यावर पार्वती सांगते, अंबास्तुती. गाथा सप्तशतीत १३ अध्याय आहेत. साधारण ७५० श्लोक आहेत. पाठविधी, देवी कवच, अर्गला, कीलक, स्त्रीसूक्त. अथर्वशीर्ष, नपार्ण मंत्र, कुंजीका, क्षमा, प्रार्थना, दुर्गेची आरती याचा समावेश आहे.
हरद्वार या तीर्थक्षेत्रात कणखल या भागात दक्षयज्ञाची जागा आहे. दक्षाने महायज्ञ केला त्याला कैलासनिवासी शिवाला निमंत्रण नव्हते. उलट त्याचा केलेला अपमान सहन झाला नाही म्हणून पार्वतीने, दक्षकन्येने यज्ञकुंडात उडी घेतली. शिव आणि त्याच्या गणांनी यज्ञ उध्वस्त केला. व देवीचे शरीर घेऊन ते भारतभर सैराभरा धावले. जेथे कर्ण पडला ते कर्नाटक तर जेथे कर म्हणजे हात पडला ते करवीर क्षेत्र बनले, अशी पौराणिक कथा आहे.त्यालाच दक्षिणकाशी असेही म्हणतात.
भारतभर नवरात्र उत्सव होतो, तो दुर्गेचा, लक्ष्मीचा नव्हे. ६४ योगीनींची पूजा, ५१ क्षेत्रापाल देवींचा गोंधळ मद्य आणि मांसाचा प्रसाद, श्रीचक्र या यंत्राची पूजा ही शक्तिपीठाची लक्षणे. ती सारी करवीरच्या प्रसिद्ध श्री अंबाबाई मंदिरात पाळली जातात. पूर्वपार मेषबळी दिला जातो. ही मूर्ती सिंहवाहिणी आहे. मस्तकावर योनीलिंग आहे. मूर्तीच्या वरच्या मजल्यावर शिवलिंग आहे, हे दगडी मंदीरच मुळी मराठ्यांच्या सम्राटांनी चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव मराठ्यांचे छत्रपती यांनी बांधले. करवीर छत्रपती शाहू महाराजांनी कधीही तिचा उल्लेख लक्ष्मी असा केला नाही. करवीर निवासिनी असा केला आहे.
शेजारच्या डोंगरावर ज्योतिबाचे म्हणजे केदारलिंगचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते ग्वाल्हेरचे (छत्रपतींचे) सरदार शिंदे (सिंदिया) यांचे कुलदैवत आहे. आजही तिथे त्यांच्या ट्रस्टचे कार्यालय आहे. कोणताही पुजारी ज्योतिबा, बिरोबा, विठोबा, महादेव यांची पूजा करत नाही. ते ब्राम्हणेतरांच्या क्षूद्र देवता असे मानतात. इतकेच काय कोणत्याही शिवपिंडीवर अर्पण केलेले दान हे खरकटे (उचिष्ट) मानून ते शुद्ध करून घेतात. (पळवतात)
छत्रपती शंभू राजे (संभाजी राजे दुसरे) यांनी १८४६ साली च्या सनदेनुसार श्री अंबाबाई मंदिराच्या पूजेचे हक्क रामचंद्र भट सांगवडेकर यांना दिले होते. त्यांचा दत्तक नातू भालचंद्र भट प्रधान याला ७ वर्षांचा असताना फसवून आंध्रातून आलेल्यांनी मंदिराचा ताबा १९५४ च्या दरम्यान घेतला. इकडे छत्रपती शाहू अणि छत्रपती राजाराम यांचे अल्पवयात निधन झाल्याने देवासचे छत्रपती शहाजी आणि नंतर नागपूरचे (विद्यमान शाहू) दत्तक आले. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि देवस्थान कमेटी या शासननियुक्त कमेटीच्या गैरव्यवस्थापनाचा पुरेपूर गैरफायदा या मूठभर पुजाऱ्यांनी घेतला. आंध्रातील तिरुपतीची ही पत्नी लक्ष्मी असा गोबेल्स प्रचार चालवला. हा एक प्रकारचा दाक्षिणात्य आणि वैष्णव संप्रदायाचा महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक दहशतवादच होय. त्याला विद्यमान केंद्र आणि राज्यातील जातीयवादी, धर्मांध राज्यकर्त्यांचा आशीर्वाद लाभल्याने पुजारी माजले. पूर्ण मंदिरावर अपला हक्क गाजवू लागले. मूर्तीची त्यांनी मोडतोड केली. आराध्य दैवत श्री अंबाबाईला घागरा चोळी घालण्याचा आचरटपणा भाजप नगरसेवक असलेल्या पुजाऱ्याने केला. त्याबद्दल त्याला पश्चातापही नाही. छत्रपती शाहूंची सनदही बोगस म्हणण्याचा उर्मटपणा पुजाऱ्यांनी केल्यावर मात्र जनक्षोभ उसळला नि पंढरपूरचे बडवे सर्वोच्च न्यायालयाने हटवले व शासनियुक्त पुजारी नेमा, अशी लाखो भक्तांनी मागणी केली. हे आंदोलन भाजपला मतपेटीतही महाग पडेल हे कळल्यावर शासन नमले. यातून अनेक समीकरणे बदलली.
ज्या स्त्रियांना अपवित्र म्हणून मंदीरप्रवेश नाकारला होता त्या स्त्रियांनी स्त्रीदेवतेला स्नान, अलंकार, नेसवले पाहिजेत ही जागृती झाली. ब्राहमणेतर स्त्री- पुरूष पुजारी नेमले जावेत, ही मागणी पुढे आली. चातुर्वर्ण्याची चौकट ढासळली. भटमुक्त गाव करण्याचे सुरू झाले. पुरोहिताशिवाय धार्मिक कर्मकांड करा, याला न्यायमूर्ती कोळसे पाटील, डॉ. भारत पाटणकर, पुरुषोत्तम खेडेकर या विचारवंतांनी उचलून धरले. अंबाबाईचे पुजारी कोट्यवधी रुपये काळे धन दरवर्षी लुटतात. ते सरकारजमा करून शेतकऱ्यांची कर्जे माफ करता येतात. समाजहितासाठी, तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी वापरता येतात, हा विचार आमदार बच्चू कडू यांनाही पटला आणि त्यांनी तो मांडला.
पुरोहितही काही कमी नाहीत. त्यांनी सरकारी देणगी पेटीतल्या पैशावरही मालकी सांगत दावा दाखल केला. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील भटशाहीला वाचवण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे पोलिस प्रशासन महसूल अधिकारी तोंडाघशी पडले. गाभाऱ्यातील त्यांचे काळे धंदे जनतेपुढे येऊ नयेत म्हणून पुजाऱ्यांना पाठीशी घालून हजारो भक्तांना फसवणारे हे दुतोंडी सरकार. पुजाऱ्यांनी दलित समाजातील पोरांना, आंबे पाडणाऱ्यांना या निमित्ताने साम, दाम, दंड, भेद वापरून आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. या प्रतिगामी चंड, मुंड, महिषासुर, रक्तबीज राक्षसांचा नि:पात ही दुर्गा, आंबाबाई निश्चित करेल याबाबत अंबाभक्तांना खात्री आहे. कोल्हापुरच्या रांगड्या भाषेत गद्दारांना आणि पुजाऱ्यांना अंबाबाईचा नायटा उठल्याशिवाय राहणार ऩाही, हेच खरे!