आस नवसर्जनाची

Update: 2017-08-21 02:31 GMT

श्रावण महिना हा अनेक सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत संभाव्य प्रजननकाळ मानला जातो. श्रावण महिन्यात सृष्टीमध्ये नवनिर्मिती घडत असते. आपण सारेच सजीव पृथ्वी तत्त्वाशी तादात्म्य असलेले जीव. त्यामुळे पृथ्वीतत्त्वाच्या गुणांची वृध्दी आपल्या देहीही होतच असते. आणि म्हणूनच सृजन काळाची प्रतिकात्मक पूजा म्हणून मातृदिनाचं (श्रावण अमावस्या) महत्त्व. आई होण्याची इच्छा प्रबळ होऊन मातृत्वभाव जागृत होतो. आणि म्हणूनच माता होऊ इच्छिणारी व माता असलेली या सगळ्यांचा हा सण.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास मातृत्व या भावनेची निकोप, सगुण वृध्दी होण्यासाठीच ही प्रथा. भावनिक दृढीकरण झालं की शारीरिक पातळीवर संप्रेरकांचं (hormones) तालबद्ध वृध्दीकरण होतं. गर्भधारणेसाठी आवश्यक त्या शरिरांतर्गत घडामोडी यातून आकाराला येतात. केवळ शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरच नाही तर कौटुंबिक व सामाजिक पातळीवरही पोषक वातावरण निर्मिती होते. कारण एक पिढी घडवण्याचं हे पवित्र कर्तव्य असतं.

'लाल त्रिकोण' हे बोधचिन्ह सुखी, आटोपशीर कुटुंबाचं द्योतक म्हणून सरकारी योजनांनसाठी निवडलं गेलं. पण काळ बदलत गेला, समाज बदलत गेला तशी समाजरचनाही बदलत गेली. मातृत्वासाठी, वंशवृध्दीसाठी बाई ठेवणं किंवा प्रथम पत्नीच्या संमतीने दुसरा विवाह असे पर्याय आधीचनिर्माण झालेही होते. आता काळ अधिकच बदलला आहे. मातृत्वाच्या सर्व संकल्पनाच लोक नव्याने अंगीकारू लागले आहेत. आणि त्यातूनच आता लाल त्रिकोणाला आणखी एक म्हणजे आयाम मिळाला आहे.

आधुनिक समाजाची गरज व नवं संशोधन यातून मातृत्व भावनेला आगळं रूप दिलं गेलंय. माझ्या वयाच्या पंचविशीत पुरूषप्रधान संस्कृतीने भारलेल्या माझ्या आजूबाजूच्या समाजामध्ये मी हिरीरीने बोलत असे. माझं म्हणणं मांडत असे. लग्न न करता एकेरी मातृत्व स्वीकारण्याच्या माझ्या विचारांना प्रचंड विरोध झाला. माझी मती अतिशिक्षणाने भ्रष्ट झाली आहे, असाच शिक्कामोर्तब करून मला बळेच लग्नाला तयार केलं गेलं. मातृत्व हवं तर लग्न व्हायला हवंच... असा अलिखित कौटुंबिक, सामाजिक नियम. मी मात्र मातृत्वासाठी लग्नच काय, पुरूषाचीही मला गरज नाही...

आधुनिक शास्त्राच्या मदतीने मी एकटीच माझं मातृत्व मिळवून शकते, असा आग्रही विचार मांडायची. पण समाजमान्यता न मिळाल्याने शेवटी मला माघार घ्यावी लागली. बाळाला कुटुंब, समाजमान्यता मिळायलाच हवी होती ना! आज पस्तीस वर्षं उलटल्यावर मात्र समाज अशा बदलांना, विचारांना सहजपणे स्वीकारू लागला आहे. शहरी जीवनात आपल्याला उत्कांतीचं प्रतिबिंब पहायला मिळतं. जगण्याच्या आधुनिक संकल्पना, वेगवेगळ्या जीवनशैलींमुळे, शारीरिक प्राकृतिक बदलांमुळे तसेच नित्यनवीन संशोधनामुळे, वैचारिक बदल समाज आदराने स्वीकारताना दिसतो.

‘सरोगसी’ म्हणजे परीक्षा नळीत इच्छुकांचे सकस स्त्री बीज व पु बीज संकरित करून गर्भ तयार करून धारणेसाठी भाडोत्री गर्भशयात तो सोडणं. गर्भाच्या संपूर्ण वाढीनंतर नैसर्गिक पध्दतीने किंवा कृत्रिम पध्दतीने अर्भकाला जन्माला घालणं. या अत्यंत तांत्रिक प्रक्रियेत डॉक्टर, इच्छुक, स्त्री बीज दाते, शुक्राणू दाते, गर्भधारणा करू इच्छिणारी स्त्री यांमध्ये आथिर्क, भावनिक, कायदेशीर व्यवहार होतात व एक निरोगी अर्भक जन्माला येतं. ते मातृत्व, पितृत्व बहाल करतं!

‘सरोगसी’ ही संकल्पना गरज म्हणून स्वीकारली गेली आणि आता तर ती धनाढ्य लोकांना सोय म्हणूनही पाहिली जाऊ लागली आहे. किन्नर या देह अवस्थेतील लोकांनी ही संकल्पना आनंदाने स्वीकारली आहे. एकेरी पालकत्वामध्येही (singal parent) पुरूष आणि स्त्रिया दोघांनाही या स्वीकारले जात आहे.’

‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असं म्हटलं आहे. सकस स्त्री बीज व सकस पु बीज यांचं शुध्दीकरण करून, तपासण्या करून मग संकरित करून ते गर्भशयात सोडणं, वाढवणं व पूर्ण कालावधीत जन्म देणं... या प्रक्रियेत एकाच्या मनात मातृत्व, पितृत्व भाव दुसर्‍याच्या शरीराअंतर्गत मातृत्वाचा अर्क असे द्विकाया संदर्भ असलेलं अर्भक जन्माला येतं. प्रथम गर्भदान व नंतर मातृत्व दान अशी ही देवाणघेवाणीची प्रक्रिया. कुशल डॉक्टरच्या अधिपत्याखालीच सरोगसी मदरच्या सहाय्याने ती घडवून आणली जाते.

सुप्रसिध्द बॉलीवुड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने अशा पध्दतीने दोन बाळांचं पितृत्व मिळवलं व एकेरी पालकत्वावर शिक्कामोर्तब केलं. तर अभिनेता शाहरूख खान व गौरी खान दाम्पत्यानं तिसऱ्या अपत्याचा जन्म सरोगेट मदरकडून घडवला. अनेक एकेरी मातृत्व,घटस्फोटित स्त्री- पुरूष, अविवाहित व्यक्ती लग्नसंस्कार नाकारून मातृत्वाचं दान स्वीकारताना आढळतात. ग्लॅमर असलेल्या दुनियेत या संकल्पना रुजल्यानंतर आता त्याचा पुरस्कार होण्यास मदत झाली आहे.

जन्माला येणाऱ्या नवजात बालकालाही संपन्न मातृ-पितृभाव, कौटुंबिक आधार, समाजमान्यता व कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे हा सुखी संसाराच्या लाल त्रिकोणाचा ‘पाचवा कोन’ही आता रूढ होताना दिसतो आहे. अनाथ बालकांचं भावनिक मातृत्व स्वीकारण्याबद्दल अनन्यसाधारण सन्मानभाव मनात असतोच. मदर टेरेसांसारखं व्यक्तिमत्त्व मातृत्वाचं एक आगळं उदाहरण आपल्यासमोर ठेवतं. अशा नाना रूपांनी मायेची पाखर सामोरी येते. नैसर्गिक मातृत्व लाभलेल्या आईची थोरवी तर आहेच पण मातृत्वाची नि नवसर्जनाची आस असणाऱ्या सर्वांनाच मातृदिनाच्या शुभेच्छा!!

डॉ. प्रतिभा बागवे

pratibhabagwe@gmail.com

Similar News