ताईंनी मला माफ केलं असावं

Update: 2017-04-06 18:06 GMT

वेळ सकाळी पावणे सहाची, तारीख 4 जानेवारी 2014 स्थळ गेट वे ऑफ इंडिया.किशोरीताई आल्या होत्या. तयारी करत होत्या. “ या समोरच्या प्लॅटफॉर्मवर मला एक जरी कॅमेरा दिसला, तरी मी गाणं थांबवणार” ही त्यांनी काल रात्री स्माईल करत दिलेली धमकी अजून ओली होती. “ सर... क्लायेंट को प्रॉमिस किया है, शूट तो करना पडेगा... मॅडम को भी बोला था...... भाई....टेलीकास्ट नही करेंगे...पर टेलीवाईज तो करना ही पडेगा” ही पार्टनर ची काळजी...आणि त्यात कार्यक्रम सरकारी...! भल्या पहाटेच्या, जानेवारीच्या थंडीत घाम सुटला होता...

आदल्या रात्री ताईंना व्हेन्यू वर भेटलो होतो. त्यांना स्टेज वगैरे आवडलं होतं, डेकोरेशन छान आहे म्हणल्या होत्या, पण मला माहीत होतं की त्या या सगळ्या गोष्टींच्या मोहताज नव्हत्या...आणि पहाटे त्यांना ऐकायला येणाऱ्या श्रोत्यांना पण या छानछोकीबद्दल काहीही पडलेली नव्हती. त्यांना ऐकायच्या होत्या फक्त ताई... पण ताईंनी ती अट घातल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या समोर आम्ही उसनं अवसान आणून हसत होतो आणि गप्पा मारत होतो. पण, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता...शूटींगचं काय? ताई हॉटेलवर गेल्यागेल्या ईमर्जन्सी मिटींग बोलावण्यात आली. क्लाएंटने आपल्या स्वभावाला जागून सहकार्य करण्यात पूर्णपणे असमर्थता दाखवली! शूट तो करना ही पडेगा. त्या सगळ्यांना तिकडेच ठेऊन मी, मूर्ती आणि प्रभात बाहेर आलो. गेटवेच्या थंड वाऱ्यातही घाम फुटला होता. मूर्तीने सिगरेट शिलगावली. आणि काही बोलायच्या आत ती संपवून पण टाकली... त्याचा स्ट्रेस आमच्या लक्षात येत होता. चालत चालत आम्ही त्या मीडिया प्लॅटफॉर्म जवळ गेलो. मूर्तीने फ्रस्ट्रेशनमध्ये त्याला एक लाथ मारली. त्याने वरुन एक कागदाचा कपटा खाली पडल्या व्यतीरिक्त काहीही झालं नाही... “ या समोरच्या प्लॅटफॉर्मवर मला एक जरी कॅमेरा दिसला, तरी मी गाणं थांबवणार”... आणि डोक्यात प्रकाश पडला... कॅमेरा दिसलाच नाही तर? कॅमेरा असण्याला बंदी नव्हती, दिसण्याला होती ! अर्थात हा शब्दच्छल मी स्वतःशीच करत होतो, पकडला गेलो असतो तर ताईंसमोर तोंडातून शब्दही निघाला नसता! मूर्ती आणि प्रभातला आयडीया दिली. त्यांना पटली की नाही माहीत नाही, पण दुसरा कुठलाही मार्ग दिसतच नव्हता. त्यांनी ताबडतोब कार्पेंटर बोलावले, त्या प्लॅटफॉर्मच्या कापडी छताला लाकडी फळ्या मारुन ते स्ट्राँग केलं. समोरच्या बाजूने लावलेलं शोभेचं कापड थोडं वर खेचलं, त्यात फक्त कॅमेऱ्याची लेन्स बाहेर येईल इतपत भोकं पाडली. कॅमेरे लावून बघीतले, समोरच्या स्टेजबरुन काहीही लक्षात येत नव्हतं. एका कमीत कमी वजनाच्या आणि आकाराच्या कॅमेरा अटेंडंटला त्या छतावर झोपवायचं ठरलं. कॅमेरा ऑनऑफ करण्यासाठी आणि टेप्स बदलण्यासाठी. त्याला धमकी देण्यात आली की ‘गलती से भी अगर तूने सिर ऊपर कीया, तो सीधा जौनपूर रवाना होगा...’ आणि पुढच्या दिव्यासाठी तयार व्हायला हॉटेलवर गेलो...

असो! तर ताई स्टेजवर आल्या. बसल्या... डोळ्यांच्या वर आडवा हात ठेवत समोरून येणाऱ्या लाईट्सची तिरिप त्यांनी थांबवली, समोर असलेल्या लाईट डिझायनरने लगेच त्याची इंटेंसिटी कमी केली. “हं! आता बरोबर आहे” म्हणत ताईंनी हळूच मान डोलावली. समोरच्या स्टेजकडे बघितलं. कॅमेरा किंवा माणूस कोणीच दिसत नाहीये म्हटल्यावर माझ्याकडे वळून बघत संमतीदर्शक मान डोलावली. मागे तानपुऱ्यावर बसलेल्या ताईंच्या नातीने माझ्याकडे बघत डोळ्यांनी खूण केली की आता निघा! वेळ झाली... मी समोरच्या स्टेजखाली बसलेल्या माणसाला हात दाखवला, वर झोपलेल्याला सांग की कॅमेरे रोल कर...

बरोब्बर सहा वाजता...ताईंनी आलाप सुरु केला....अमेझिंग...तो दैवी स्वर...षडज् होता की धैवत...मला त्यातलं काही कळत नाही, पण सगळी दैवतं माझ्यावर एकाच वेळी मेहेरबान झाली होती.....ताईंची ताण...इतका सणसणीत आवाज होता, की समोरच्या ताजच्या टॉवरच्या खिडक्यांमधे पण पटापट लाईटस् चालू झाले...आणि मग ते चालूच राहीले... पुढचे दोन तास आम्ही सगळेच अक्षरशः डुंबत होतो. आनंदात... स्वरसागरात...आणि सूर्य वर आल्यावर लक्षात आलं की छतावर झोपलेल्या त्या माणसाची सावली समोरच्या कपड्यावर पडण्याची पूर्ण शक्यता आहे! पण, तसं काहीही होण्याआधीच, ताईंनी टाळ्यांच्या कडकडाटात तृप्त श्रोत्यांना नमस्कार केला. बॅकस्टेजला जाऊन ताईंना वाकून नमस्कार केला. खरंच सांगतो त्यांनी माझ्या डोळ्यांत बघितलं, तेव्हा मला अगदी आतून जाणीव झाली की माझी लबाडी त्यांनी कधीच अळखली आहे....मला वाटतं त्यांनी मला माफ केलं असावं...

प्रतिक कदम

(लेखक प्रोफेशनल लाईव्ह कॉन्सर्ट शो डारेक्टर आहेत)

Similar News