शिव - शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून शाहू महाराज गायब, संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत
महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा मानला जातो. पण याच शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातून राजर्षी शाहू महाराज गायब होत असल्याची खंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मॅक्स महाराष्ट्र अवार्ड 2023 या कार्यक्रमात व्यक्त केली.;
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, असं म्हटलं जातं. पण राज्याचा कल्याणकारी कारभार ज्या मंत्रालयातून चालतो. त्याच मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातून राजर्षी शाहू महाराजांचा फोटो गायब होत असल्याची खंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
आपण शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतो. पण आता हळुहळू मंत्रालयातील कार्यक्रमातून आपले महापुरुष गायब होत आहेत.
ज्या राजर्षी शाहू महाराजांनी बहूजन कल्याणाचा विचार दिला. वेगवेगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी बोर्डिंग सुरु केले. ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली, त्याच राजर्षी शाहू महाराजांचे फोटो मंत्रालयातून गायब होत आहेत, ही खंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघ आयोजित मॅक्स महाराष्ट्र अवार्ड २०२३ या कार्यक्रमात व्यक्त केली.