शिंदे गटाचा शिवसेना भवनावर कब्जा शक्य आहे का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यानंतर शिवसेना भवनाचा ताबा घेण्याची चर्चा होती. त्यावरून शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेऊ शकतो का? यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

Update: 2022-07-19 07:33 GMT

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्यात वाढ झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करत उध्दव ठाकरे यांना धक्का दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार असल्याचे वृत्त येत होते. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेतील फुटीर गट भाजपच्या पाठींब्याने बेकायदेशीर सरकार चालवत आहे. त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शिवसेना ही आमदार, खासदार यांच्यावर उभी नाही. तर ग्राऊंडवरचा शिवसैनिक हा शिवसेनेचा पाया आहे. त्यामुळे शिवसेना फोडण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी शिवसेना उभारी घेईल. याबरोबरच शिवसेनेचा फुटीर गट शिवसेना भवनावर ताबा घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी उपाय शोधून ठेवला आहे. भविष्यात असं काही घडू शकतं म्हणून की काय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाई ट्रस्टच्या नावावर शिवसेना भवन ठेवले आहे. त्यामुळे शिवसेना भवनवर ताबा घेणे शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, फुटीर गट शिवसेना भवनवर फक्त ताब्याचा दावाच करू शकत नाही. तर उद्या शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची नाहीच असंही म्हणतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडायचे आहेत, असं भाजप नेते सांगत आहेत. त्यामुळे ते शिवसेनेचे तुकडे पाडण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

न्यायमुर्तींकडून लोकशाहीचा खून होणार नाही अशी अपेक्षा

20 जुलै रोजी शिंदे सरकारच्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींकडून लोकशाहीचा खून होणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसंच आमचा न्यायालयावर विश्वास असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

मंत्रीमंडळ विस्तारासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीत आले नाहीत.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी, नारायण राणे मंत्रीमंडळ विस्तारासाठी कधीही दिल्लीत आले नव्हते. मात्र सध्याचे मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करत आहेत. परंतू विकासासाठी जर दिल्लीत आले असतील तर चांगली गोष्ट आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत

शिवसेनेचे खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. तसेच त्यांना काही अमिष दाखवली जात आहेत. याबरोबरच त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. मात्र यातून शिवसेनेचे खासदार फुटणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले. तर काही खासदार का फुटले आहेत. त्याचीही कारणं आमच्याकडे आहेत. मात्र ती योग्य वेळी सांगू असंही संजय राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News